नाशिक | प्रतिनिधी | Nashik
भद्रकाली भागात (Bhadrakali Area) निवडणूकीपूर्वी घडलेल्या घरे व वाहने जाळपोळीला (Arson) आता राजकारणाचा धूर निघू लागला आहे. यात कथित गुंड वा नेत्याने पाच सराईतांना जाळपोळीसाठी सुपारी देत पेट्रोल पुरविल्याचे समोर येत आहे. कारण भद्रकाली पोलिसांनी तपास करुन पाच संशयितांना अटक (Arrested)केली आहे. त्यानुसार मुख्य सूत्रधाराचा शोध सुरु झाला असून मत विभाजन, दहशत पसरविण्यासाठी हा प्रयत्न झाल्याचा पोलिसांचा संशय आहे.
हे देखील वाचा : Nashik News : सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील बंधाऱ्यात बुडून दोघांचा मृत्यू
याबाबत अधिक माहिती अशी की, सनी संजय गावडे (२८, रा. पिंपळे गल्ली, म्हसरूळ), प्रशांत बाळासाहेब फड (३१), प्रविण बाळू कराटे (२४, दोघे रा. विद्यानगर, मखमलाबाद), आकाश राजू साळुंके (२४, रा. दत्त चौक, सिडको), विजय सुरेश लोखंडे (२८, रा. आडगाव) अशी अटकेतील समाजकंटकांची नावे आहेत. सनी, प्रशांत व प्रविण यांना शनि शिंगणापूर येथून पकडण्यात आले. तर आकाश व विजय यांना नाशकातून (Nashik) पकडण्यात आले. प्राथमिक तपासात परिसरात दहशत पसरवण्यासाठी त्यांनी जाळपोळ केल्याची कबुली दिली.
हे देखील वाचा : Nashik Crime News : अट्टल घरफोड्या ताब्यात; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
गुरुवारी (दि.१६) मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास वाकडी बारव, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयासमोर, नानावली व शितळा देवी मंदिर परिसरात अज्ञात टोळक्याने ९ दुचाकी, एक ट्रक, टेम्पो अशा वाहनांना आग (Vehicle Fire) लावून जाळपोळ केली होती. जाळपोळीत तीन कारचेही किरकोळ नुकसान झाले होते. तसेच जहांगिर कब्रस्तान जवळील एका घरावर पेटलेली बाटली फेकून झोपलेल्या कुटुंबाचे घर जाळण्याचा प्रयत्न टोळक्याने केला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात जाळपोळीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
हे देखील वाचा : Nashik Fraud News : विमा प्रतिनिधीकडून ठेवीदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक; गुन्हा दाखल
त्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, भद्रकालीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी तपास पथके नेमली. परिसरातील सीसीटीव्ही, यांत्रिक तपास, माहितगाराच्या माहितीनुसार संशयितांचा माग काढला. यानंतर आता पाचही संशयितांना शुक्रवारी (दि.२४) न्यायालयात (Court) हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे देखील वाचा : Nashik Loksabha Election 2024 : स्ट्राँगरुम भोवती ‘फोर्थग्रेड’ सुरक्षा
दरम्यान, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष नुरुटे, विक्रम मोहिते, सहायक निरीक्षक सत्यवान पवार, सहायक उपनिरीक्षक यशवंत गांगुर्डे, हवालदार नरेंद्र जाधव, सतिष साळुंके, संदीप शेळके, पोलिस नाईक कय्युम सैयद, लक्ष्मण ठेपणे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.
जाळपोळीला राजकीय धुर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने संशयितांना जाळपोळ करण्यासाठी सुपारी दिली. त्यानुसार संशयितांनी वाहनांची जाळपोळ करीत दहशत करण्याचा प्रयत्न केला. लोकसभा मतदानाच्या आधी हा प्रकार झाल्याने त्यास राजकीय लागेबंध असल्याच्या संशयास वाव मिळत आहे. मात्र पोलिसांनी त्यास दुजोरा दिलेला नसून मुख्य सुत्रधार पकडल्यानंतरच जाळपोळीचे कारण समोर येईल असे पोलिसांनी सांगितले.
संशयित सराईत
भद्रकाली पोलिसांनी पकडलेले पाच संशयित हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे भद्रकाली पोलिसांनी सांगितले. त्यापैकी प्रशांत फड याच्याविरोधात २०१८ मध्ये म्हसरुळ येथे वाहनाची जाळपोळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तसेच संशयितांनी जाळपोळ करण्यासाठी परिसर वाटून घेतले होते. त्यामुळे काही क्षणात चार ठिकाणी वाहनांची जाळपोळ झाल्याचे समोर आले आहे. यानंतर संशयित दुचाकींवर बसून फरार होते. ते शिर्डी, रहाता, नगर या भागांत हॉटेलांत वास्तव्य करत होते.