अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
तरूणाच्या अपहरण प्रकरणात सुटका करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला करणार्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार खंडू शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान अटकेतील चौघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तरूणाच्या अपहरण प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष कुटे (रा. सारसनगर), रामेश्वर पालवे, ज्ञानेश्वर पालवे, तेजस जावळे (तिघे रा. कोल्हार ता. अहिल्यानगर) अशी अटकेतील चौघांची नावे आहेत. व्याजाच्या पैशाच्या वादातून आकाश कार्ले (वय 27, रा. दहिगाव साकत खुर्द) यांचे संशयित आरोपींनी अपहरण करून त्यांना मारहाण, धमकी व डांबून ठेवण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्ले यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीने आर्थिक अडचणीमुळे रामेश्वर पालवे याच्याकडून 70 हजार रुपये घेतले होते. त्यानंतर त्याने दरमहा पाच हजार रुपये व्याजाची मागणी केली. फिर्यादीने नकार दिल्याने आरोपींनी 20 मे रोजी रात्री त्याला घराबाहेर बोलावून स्कॉर्पिओ गाडीत बसवून मारहाण केली. तसेच 90 हजार रुपये देण्याची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप आहे.
दरम्यान नगर तालुका पोलिसांनी अपहृत तरूणाच्या मोबाईलचे लोकेशन तपासले असता ते कोल्हुबाईचे कोल्हार परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर नगर तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी खंडेराव शिंदे, विक्रांत भालसिंग तसेच दोन होमगार्ड यांचे विशेष पथक तयार करण्यात आले. स्टेशन डायरीत नोंद करून संबंधित पथकाला अपहृत युवकाच्या भावासह व मित्रांसोबत तातडीने कोल्हार येथे रवाना करण्यात आले. दरम्यान, पोलीस पथकाने कोल्हार येथील दोस्ती नावाच्या हॉटेलमध्ये कैद करून ठेवलेल्या कार्ले याची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी अपहरणकर्त्यांनी पोलिसांवर अचानक हल्ला चढविला होता. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी विक्रांत भालसिंग यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर खंडेराव शिंदे हे किरकोळ जखमी झाले. या हल्ल्याची स्वतंत्र फिर्याद एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.




