राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
सद्गुरु गंगागिरी महाराजांनी सप्ताहाच्या माध्यमातून शुध्द भक्ती दिली. गंगागिरी महाराज सप्ताहात आहेत. शरीर मरते आत्मा मरत नसतो. आत्मा अचल आहे, असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले. सद्गगुरु गंगागिरी महाराज 179 व्या अखंड हरिनाम सप्ताहात बुधवारी दुसर्या दिवशीच्या पहिल्या वाक्पुष्प मध्ये उपस्थित भाविकांना उपदेश करताना ते बोलत होते. राहाता तालुक्यातील धनगरवाडी सप्ताहाला दुसर्या दिवशी तीन लाखाहुन अधिक भाविकांनी हजेरी लावत महंत रामगिरी महाराज यांच्या सुश्राव्य प्रवचनाचा व आमटी भाकरीचा आस्वाद घेतला. धनगरवाडी दिघी रोडवरील सप्ताह मैदान भाविकांनी फुलून गेले आहे. अधुन मधून येणारी पावसाची बुरबूर आणि हिरवाईने नटलेला परिसर, प्रहरा मंडपातून उमटणारे भजनाचे सुर, भगव्या पतांकांचा डामडौल, जय हरीचा नारा यामुळे धनगरवाडीला पंढरीचे रुप प्राप्त झाले आहे.
महंत रामगिरी महाराज यांनी भगवत गितेतील 12 व्या अध्यायातील 6 व्या श्लोकावर प्रवचन केले. महाराजांनी काल उपासना, भक्तीचे प्रकार यावर प्रकाश टाकत विविध प्रसंगाद्वारे भाविकांना मंत्रमुग्ध केले. रामगिरी महाराज पुढे म्हणाले, भगवंत अर्जुनाला सांगतात जे मला जीवन अर्पण करतात. अनन्य योगाने जे ध्यान करतात, त्याचा मी उध्दार करतो. अर्जुन म्हणतात, तुमची उपासना करणारे भक्त आहेत. निरंतर ध्यानामध्ये राहुन उपासना करतात. परंतु एक सगुण उपासना आणि दुसरी निर्गुण उपासना! दोन प्रकारचे उपासक आहेत. निर्गुण उपासक आणि सगुण उपासक यापैकी उत्तम भक्त कोण आहेत? असा प्रश्न अर्जुनाने केला. भगवंताने दोन्ही उपासनेचे वर्णन केले. जोपर्यंत अंतकरणात देह अहंकार आहे. संसार तुम्हाला सत्य भासतो. जगत सत्य भासते, आणि व्यवहार तुम्ही करित आहात. देह अहंकार आहे तो पर्यंत निर्गुण उपासना क्लेशदायक आहे. संसार सत्य वाटतो त्याला निर्गुण उपासना क्लेश आहे. अशा व्यक्ती करीता सगुण उपासना असते.
नाथ महाराजांचे अभंगाचा उल्लेख करत महाराज म्हणाले, किर्तनाची मर्यादा असावी. भक्ती, ज्ञानाच्या विरहित कोणतीच चर्चा किर्तनात नसावी. अलिकडच्या काळात काय परिस्थिती आहे, काही किर्तनकार असे आहेत की त्यांनी ‘तमासगिर’ व्हायला पाहिजे होते, ते चुकून कीर्तन करतात. हे दुदैव आहे. कीर्तन परंपरा ही साधारण परंपरा नाही. या जीवाला भवबंधनातून मुक्ती देणारी ही परंपरा आहे. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांनी आपल्याला अतिशय शुध्द परमार्थ दिला. सद्गुरु गंगागिरी महाराजांनी आपल्याला अतिशय शुध्द परमार्थ दिला. सप्ताहातील भजनही अतिशय शुध्द आहे. ते भगवंता करिता आहे. टाळकरी दिवसा 3 तास, रात्री 3 तास असे सहा तास उभे राहुन भजन करतात. सर्व स्वखर्चाने येथे आले आहेत. दक्षिणा नाही, भाडे नाही. जशी सोय असेल तसे राहतात.
पंढरपूरला वारकरी जे मिळेल तसे राहतात. त्यांची फक्त एकच इच्छा असते. ती म्हणजे केव्हा त्या परमात्म्याचे दर्शन होईल. केंव्हा माझा उध्दार होईल. पायी दिंडीत महिना महिना चालुन येतात. बारीमध्ये 20-20 तास उभे राहतात. पांडूरंगाचे दर्शन झाल्यानंतर समाधान मिळते. परमात्म्याचे चरणाचे दर्शन झाल्यावर चालल्याचा शिणभाग उतरतो. ही शुध्द भक्ती आहे. सप्ताहातील भजनही भगवंता करीता आहे. गोपी भगवंता करिता रडल्या त्याचे गीत झाले. जो भगवंता करीता रडतो त्याचे रडणे देखील गीत होते. सद्गुरु गंगागिरी महाराजांचे पुणतांब्याला कीर्तन होते. आषाढ वारी सद्गुरु गंगागिरी महाराजांनी सुरु केली आहे. ही यात्राही गंगागिरी महाराजांनीच सुरु केली. एकदा पुणतांब्याच्या यात्रेत तमाशाचा फडही होता. तुकाराम बाबा खेडलेकर बालक होते. ते तमाशात काम करायचे. ते गंगागिरी महाराजांच्या दर्शनाला आले.
महाराजांनी सांगितले तुकाराम तुला आज किर्तनात चाल म्हणायची! तुझा आवाज चांगला आहे. त्यावर तुकाराम म्हणाले, महाराज मी तमाशात काम करतो. मला किर्तनाची चाल येत नाही. अभंग पाठ नाही. त्यावर महाराजांनी तुकारामाला अभंग लिहुन दिला. आणि गंगागिरी महाराजांच्या किर्तनात तुकाराम बाबा खेडलेकरांनी चाल म्हटली. त्यावर महाराज म्हणाले, तुकाराम भगवंताने तुला छान आवाज दिला. या आवाजाचा उपयोग भगवंतासाठी केला तर तुझे कल्याण होईल. त्यावर तुकाराम म्हणाले, महाराज मी तमाशात काम करतो, त्यामुळे मला दोन पैसे मिळतात. त्याच्यावर माझा प्रपंच चालतो. अजुन मी लहान आहे. परंतु घरात कुणी कमावते नाही. उपाशी राहातील. त्यावर गंगागिरी महाराज म्हणाले, तुकाराम काळजी करु नको. सर्व जगाची काळजी करणारा तो परमात्मा आहे. पशुपक्षी कामाला जातात का हो? त्यांनाही भगवंताना कधी उपाशी ठेवले नाही! महाराजांच्या उपदेशाचा तुकाराम बाबांवर इतका परिणाम झाला, की त्यांनी तमाशा सोडून ते नंतर आळंदी जावून जोग महाराजांकडे राहिले. त्यांच्या जीवनात जे परिवर्तन झाले ते गंगागिरी महाराजांच्या मुळेच झाले. महापुरुषांच्या शब्दात एक शक्ती आहे.
सद्गुरु गंगागिरी महाराज योगी होते. सराला बेट गोदावरीच्या उदरात आहे. त्याकाळात गोदावरी बारा महिने वाहत होती. मामासाहेब दांडेकरांनी जोग महाराजांचे आत्मचरित्र लिहीले. जोग महाराज दोन महापुरुषांना आदर्श मानायचे. एक गंगागिरी महाराज व दुसरे शिलनाथ महाराज! शिलनाथ महाराजांची समाधी इंदौरला आहे. या महापुरुषांनी आपल्याला शुध्द परमार्थ दिला. अनन्य भक्ती दिली. भगवंताने अर्जुनाला म्हणजेच पार्थाला उपदेश केला. ज्याला अंतकरणात भक्तीची तळमळ असते त्यालाच उपदेश केला जातो.
यावेळी महंत भास्करगिरी महाराज, माजी आमदार बाळासाहेब मुरकूटे, पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त प्रकाश महाराज जंजाळ, नरहरी महाराज चौधरी, शिवाजीराव लहारे, संचालक विष्णुपंत शेळके, लक्ष्मण महाराज मेंगडे, किसन महाराज पवार, बबनराव मुठे, भोला उदावंत, प्राचार्य डॉ. एस. आर. बखळे, प्रा. आप्पासाहेब नळे, श्रीरामपूरचे नगरसेवक योगेश जाधव, अॅड. संतोष कांबळे, नगरसेविका भारती परदेशी, सचिन खर्डे, युवा नेते निरज मुरकूटे, मधुसुदन महाराज, संदिपान महाराज, नवनाथ महाराज म्हस्के, बाळासाहेब महाराज रंजाळे, अमोल महाराज बडाख, परमेश्वर महाराज भारत, चंद्रकांत महाराज सावंत, उत्तम महाराज गाढे, गोविंद महाराज मलिक, गोकूळ महाराज, नवनाथ महाराज आंधळे, विक्रम महाराज शिरसाठ, महेश महाराज, प्रा. आप्पासाहेब नळे यांचेसह भाविक लाखोंच्या संख्येने उपस्थित होते.




