नाशिक | प्रतिनिधी | Nashik
हरसूल (Harsul) येथे एका हॉटेलात (Hotel) मद्यधुंद अवस्थेत जेवणासाठी गेलेल्या नाशिकसह पर जिल्ह्यातील चार सराईत गुंडांनी गावठी पिस्तूलातून (Pistol) सात राऊंड हवेत फायर करुन नाशिककडे (Nashik) पळ काढला. ही माहिती कळताच गंगापूर पोलिसांनी (Gangapur Police) नाकाबंदी करुन भरधाव इनोव्हा कार अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशयितांनी पोलिसांना न जुमानता पळ काढला. यानंतर चोर आणि पोलिसांचा खेळ सुरु झाल्यावर पळून जाणाऱ्या चौघा सराईतांचा पाठलाग करुन गावठी पिस्तूलासह गजाआड करण्यात यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, इम्रान अयनूर शेख (वय-२५ रा. गणेशचौक, संजीवनगर, अंबड लिंकरोड, नाशिक), शेखर दिलीपराव कथले (वय-२९, रा. शिवाजीनगर ता. सेलु, जि. परभणी), अरबाज शब्बीर खान पठाण (वय-२३ रा. डिग्रसवाडी, सेलु, जि. परभणी) व राहुल श्याम क्षत्रिय(वय २४ रा. साई बाबा मंदीराचे बाजुला, संत जनार्दन नगर, नांदुरनाका, नाशिक) अशी अटक केलेल्या सराईत संशयितांची (Suspects)नावे आहेत. १६ मे रोजी सायंकाळी हरसूल येथील हॉटेल कश्यपी फोर्ट येथे चौघेही संशयित मद्य पिऊन जेवण करण्यासाठी आले. त्यांनी हॉटेलात ऑर्डर देऊन जेवण केले.
हे देखील वाचा : Nashik Igatpuri News : अन् प्रवाशांनी रेल्वेतून घाबरून मारल्या उड्या; नेमकं काय घडलं?
यानंतर काहीतरी ऑर्डर दिल्यावर ती ‘लवकर का आणली नाही’, यातून वाद घालत एकाने जवळील गावठी पिस्तूलातून हॉटेलचा मॅनेजर आणि वेटरच्या समोर सात राऊंड हवेत गोळीबार केला. त्यानंतर धाकाने चौघे इनोव्हात बसून नाशिकच्या दिशेने पळाले. ही माहिती हरसूल पोलिसांना कळविण्यात आली. त्यांनी गुन्ह्याचा तपास करतांना गंगापूर पोलिसांना संशयित नाशिकमार्गे येत असल्याची माहिती दिली. त्यानुसार गंगापूर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी डीबीचे उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, हवालदार रविंद्र मोहिते, गणेश रेहरे, सचिन काळे आदींना नाकाबंदीसह संशयितांना पकडण्याचे आदेश दिले.
त्यानुसार, एमएच-२०-सीए-९५९५ ही संशयास्पद इनोव्हा गिरणारे येथून गंगापूर रोडकडे येत असल्याचे दिसले. त्यानुसार पथकाने गंगापूर जकात नाक्याजवळ इनोव्हा थांबविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा संशयित चालकाने कार न थांबविता पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी डीबी मोबाईल कारने पाठलाग करून इनोव्हा गंगापूर गाव जकात नाक्याजवळ अडविली. तेव्हा चौघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा पाठलाग करुन पकडण्यात आले. या कारवाईत इनोव्हा कार, एक पिस्तूल, रिकामी पुंगळी हस्तगत करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : Loksabha Election 2024 : निवडणूक खर्चात डॉ. भारती पवार आघाडीवर
दरम्यान, याबाबत हरसूल पोलीस ठाण्यात (Harsul Police Station) चौघांवर प्राणघातक हल्ल्यासह आर्म अॅक्ट आणि गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) भारतीय हत्यार कायदा, महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा (Case) दाखल झाला आहे. तर पुढील तपास सहायक उपनिरीक्षक गणेश पाटील करत आहेत.
एकावर खुनाचा तर, दुसऱ्यावर लुटीचा गुन्हा
इम्रान शेखवर सेनगाव व अंबड पोलिस ठाण्यात खून करुन पुरावा नष्ट करणे, आर्म अॅक्ट, जबरी चोरीचा गुन्हा दाखल असून शेखर कथलेवर सेलू पोलीस ठाण्यात बेकायदा जमाव जमविणे, हाणामारी, धमकी आणि राहुल क्षत्रियवर आडगाव पोलिसांत जबरी चोरी, चोरीचे गुन्हे दाखल आहेत. संशयितांचा ताबा लवकरच हरसूल पोलिसांकडे दिला जाणार आहे.