Thursday, May 2, 2024
Homeनाशिकआयुक्तांच्या हस्ते पोलिसांचा सत्कार

आयुक्तांच्या हस्ते पोलिसांचा सत्कार

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

पोलिस सेवक, अधिकारी तनामनाने निरोगी राहिल्यास त्यांची कार्यक्षमता, समर्पणवृत्ती वाढेल. कर्तव्यात यश मिळून समाजाला त्याचा फायदा होईल. नागरिकांना चांगली सेवा पुरवायची असेल तर पोलिसांनी निरोगी, तंदुरुस्त राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त दिपक पांण्डेय यांनी केले.

- Advertisement -

परिमंडल दोन विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्या नाशिकरोड पोलिस ठाण्यातील सभागृहात बुधवारी सायंकाळी झालेल्या कौतुक सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी पोलिस उपायुक्त विजय खरात, अमोल तांबे, पोर्णिमा चौगुले, सहाय्यक आयुक्त समीर शेख, मोहन ठाकूर, अशोक नखाते, प्रदीप जाधव, दिपाली खन्ना, शांताराम गायकवाड, नवलनाथ तांबे आदींची प्रमुख उपस्थित होते.

यावेळी पोलिस आयुक्त पांडे म्हणाले की, मानसिक ताण नसेल तरच उत्तम कामगिरी करता येते. आपले काम चांगली सेवा देण्यासाठी असावे. त्यासाठी जे करावे लागते ते करणे आपली जबाबदारी आहे. पोलिस हे सेवेत दाखल होतात तेव्हा त्यांच्यात काही करुन दाखविण्याची उमेद असते. परंतु, अनुभव नसतो. रोगी माणसांकडून सेवेची अपेक्षा ठेवता येत नाही. अंमलदार, लिपिकसह सर्व अधिकारी, सेवक रोगमुक्त व्हावे यासाठी आमची उपाययोजना सुरु आहे.

पोलिसांच्या कुटुंबाचेही कल्याण होईल यासाठी आयुक्तालयाने पुढाकार घेतला आहे. पोलिसांच्या मुलांची, त्यांच्या शिक्षणाची काळजी घेण्यात येणार आहे. पोलिसांनी आपण व्यावसायिक, सक्षम आहोत हे लक्षात ठेवावे. महिला पोलिस सेवक विविध जबाबदार्‍यांसाठी पुढे येत आहेत. महिला पोलिसांनी टवाळखोरांवर कारवाई करुन आदर्श निर्माण केला आहे.

यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली, अनिल शिंदे, निलेश माईनकर, कुमार चौधरी, सुभाषचंद्र देशमुख, राकेश हांडे यांच्यासह उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी व अंमलदार यांचा गौरव आयुक्तांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व फुल देऊन सत्कार करण्यात आला. उपायुक्त विजय खरात यांनी प्रास्तविक तर सहाय्यक आयुक्त अशोक नखाते यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प, इंदिरानगर, सातपूर, अंबड पोलिस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या