मालेगाव | प्रतिनिधी Malegaon
येथील सटाणारोड भागातील एचडीएफसी बँकेत भरणा करण्यासाठी येथील मामको बँक संचालक व दुसाने ज्वेलर्सचे संचालक शरद दुसाने यांच्या हातातील लाखो रूपयांची रोकड असलेली बॅग हिसकावून घेत पलायनाचा कट पोलिसांनी उधळून लावला. याप्रकरणी सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करत चौघांना अटक केली आहे. सातार्यातील दोघा सराईत गुन्हेगारांचा तसेच बँकेच्या कॅशियरचा या कटात सहभाग असल्याचे उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
येथील मामको बँक संचालक व प्रसिध्द दुसाने ज्वेलर्सचे संचालक शरद दुसाने हे किंवा पिढीतील कर्मचारी बँकेत दररोज दुकानातील लाखो रूपयांचा भरणा करण्यासाठी जात असतात. दररोज मोठ्या प्रमाणात दुसाने रक्कम भरत असल्याची माहिती घेत व पुर्ण रेकी करत रक्कम लुटण्यासाठी कट या टोळीने रचला होता. यासाठी सातार्यातील दोघा सराईतांना देखील पाचारण करण्यात आले होते.लाखो रूपयांच्या रक्कमेसंदर्भातील माहिती त्यांना कॅशियरकडून मिळाल्याचे त्याचा देखील कटातील सहभागामुळे उघडकीस आले आहे.
मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास शरद दुसाने सटाणानाका भागातील एचडीएफसी बँकेत पैशांचा भरणा करण्यासाठी आल्यावर त्यांची बॅग हिसकावून घेत पलायन करण्याच्या दृष्टीकोनातून सिध्दार्थ सतिष महाडीक (२४, रा. आरे, ता. सातारा) व रोशनकुमार सावळीराम अहिरे (३५, रा. संगमेश्वर) हे बँक शाखेच्या बाहेर मिरचीची पुडसह काळ्या रंगाचे मास्क व काळ्याच रंगाचे जॅकेट व हातात ग्लोज घालून लुटीच्या तयारीत होते. यावेळी एक दुचाकी मो. सायकल देखील त्यांनी सज्ज ठेवली होती. मात्र हा प्रकार परिसरातील काही चाणाक्ष नागरीकांच्या लक्षात आला.
काळ्या रंगाचे मास्क घातले असल्याने त्यांचा संशय बळावून त्यांनी तातडीने याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांना दिल्याने पोलीस पथकाने तात्काळ बँक शाखेकडे धाव घेतली. पोलिसांना पाहताच दोघांनी पलायनाचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी पाठलाग करीत दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता दुसाने यांची लाखो रूपयांची रोकड असलेली बॅग हिसकावून घेत पलायन करण्याचा कट उघडकीस आला.
या कटात सिद्धार्थ सतिष महाडीक (२४, रा. सातारा), सौरभ राजेंद्र निकम (रा. पोंगरवाडी, सातारा), रोशनकुमार सावळीराम अहिरे (३५, रा. संगमेश्वर, मालेगाव), प्रशांत उर्फ पिंटया अशोक जाधव (३६, रा. सोयगाव, मालेगाव), दिलीप मंगा सूर्यवंशी (३७, टेहरे ता. मालेगाव) व राहूल (पूर्ण नाव नाही) हे सहा जण सहभागी असल्याचे उघडकीस आले.
पोलिसांनी त्वरेने कारवाई करत सिध्दार्थ महाडीक, रोशनकुमार अहिरे, प्रशांत जाधव व बँक कॅशियर दिलीप सुर्यवंशी या चौघांना अटक केली असून फरार झालेल्या सौरभ निकम (सातारा) व राहुल नामक संशयिताचा शोध घेतला जात आहे. पोलीस शिपाई नितीन दिनेश अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार छावणी पोलिसांनी या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या टोळीतील सौरभ राजेंद्र निकम व सिध्दार्थ सतिष महाडीक हे दोघे सराईत असून त्यांच्याविरूध्द सातारा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सौरभ फरार झाला असला तरी त्याचा शोध घेतला जात आहे. या कटात अजुन कुणाचा सहभाग आहे याची कसून चौकशी केली जात असल्याचे पोलीस उपअधिक्षक दर्शन दुग्गड यांनी सांगितले.
दरम्यान, शरद दुसाने यांची लुट करण्याचा प्रयत्न पोलिसांनी असफल ठरविल्याने मामको बँक ज्येष्ठ संचालक राजेंद्र भोसले यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांचा सत्कार करीत त्यांच्यासह पथकांचे अभिनंदन केले.




