वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur
तालुक्यातील बळेगाव येथे एका पोलीस कर्मचार्याचा खून करून एका पडक्या पत्र्याच्या घरात पुरल्याची खळबळजनक घटना घडली होती. याप्रकरणाचा अवघ्या काही तासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उलगडा करत याप्रकरणी एका आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शिऊर पोलीस ठाणे येथे रविवार दि.4 जानेवारी रोजी देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले व बळेगाव येथील रहिवासी नानासाहेब रामजी दिवेकर (वय 48) हे बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणाचा पोलीस तपास करत असताना तपासादरम्यान बळेगाव येथे नानासाहेब दिवेकर यांचा खून करून अज्ञाताने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जमिनीत पुरला असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सदर मृतदेह बाहेर काढत रुग्णालयात दाखल केला होता. या प्रकरणात शिऊर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक रणखांब यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गंभीर गुन्ह्याचा गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड,अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी घटनास्थळी भेट दिली. स्थानिक गुन्हे शाखेने सदर गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखा पथक तपास करत असताना तपासादरम्यान पथकाला गोपनीय बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, सदरचा खून हा मयताचा लहान भाऊ लहानु रामजी दिवेकर राहणार बळेगाव याने केला असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले व गुन्हा बाबत विचारपूस केली असता त्याने त्याचे मोठा भाऊ नानासाहेब दिवेकर हा यांच्यासोबत वैयक्तिक व कौटुंबिक वाद असल्याने दोन जानेवारी रोजी रात्री घरात नानासाहेब दिवेकर झोपेत असताना त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याला जीवे ठार मारून घराजवळच पत्राच्या शेडमध्ये खड्डा करून पुरून टाकले असल्याची कबुली दिली. आरोपीने कबुली दिल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.




