अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
तोफखाना पोलीस ठाण्यात परस्परविरोधी दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यासंदर्भात पोलीस ठाण्यात आलेले दोन गट एकमेकांवर भिडले. पोलिसांनी मध्यस्थी करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही या दोन्ही गटांनी जुमानले नाही. या प्रकरणी पोलिसांनी फिर्यादी होत दोन्ही गटांच्या सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अंमलदार रावसाहेब सानप यांनी फिर्याद दिली आहे. स्वप्निल अरुण म्हस्के (वय 32), अग्रेस अरुण म्हस्के (वय 57), संदेश अरुण म्हस्के (वय 36), सियोन अरुण म्हस्के (वय 39), छाया नंदकुमार म्हस्के (वय 55) व नंदकुमार विद्याधर म्हस्के (वय 68, सर्व रा. झोपडी कॅन्टीन, सावेडी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरगुती कारणातून सोमवारी छाया म्हस्के यांनी अग्रेस म्हस्के यांच्याविरूध्द तक्रार दिली होती. तर मंगळवारी अग्रेस म्हस्के यांनी नंदकुमार म्हस्के व छाया म्हस्के यांच्याविरोधात तक्रार दिली होती.
पोलिसांनी परस्परविरोधी अदलखपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. मंगळवारी या दोन्ही तक्रारदारांना पोलीस ठाण्यात बोलविले होते. दुपारी पावणे दोन वाजता दोन्ही गटात शिवीगाळ, मारहाणीची घटना घडली. म्हणून त्यांच्याविरूध्द पोलिसांनी फिर्यादी होत गुन्हा दाखल केला आहे.