Friday, May 3, 2024
Homeनगरपोलीस आत्महत्या प्रकरणी मला बदनाम करण्याचे कारस्थान

पोलीस आत्महत्या प्रकरणी मला बदनाम करण्याचे कारस्थान

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील भाऊसाहेब आघाव या पोलीस हवालदाराच्या आत्महत्या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांना आलेल्या धमकीपत्राचा तपास करून मूळ आरोपीवर कारवाई करावी, अशी मागणी धमकीपत्रात नामोल्लेख झालेल्या सुशेन महाराज नाईकवाडे यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे केली आहे. याप्रकरणी त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात हजर होऊन आपला जबाब नोंदविला.

- Advertisement -

नाईकवाडे हे व्याख्याते कीर्तनकार असून महाराष्ट्रभर त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. मूळ आरोपीचा शोध घेऊन माझी बदनामी थांबवा, अशी मागणी सुशेन महाराज नाईकवाडे यांनी राहुरी पोलिसांकडे केली आहे.

राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील पोलीस हवालदार भाऊसाहेब आघाव यांनी आपल्या पोलीस सहकार्‍यांच्या जाचास कंटाळून मुळा धरणावरील पोलीस चौकीवर सर्विस रायफलमधून स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली होती. सदर घटनेने जिल्ह्यातील पोलीस वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती. त्यानंतर काही दिवसांतच आघाव यांच्या घरी एका निनावी पत्राव्दारे सुशेन महाराज नाईकवाडे यांच्याकडे दहा लाख रुपये आणून द्या, नाहीतर तुमच्या कुटुंबियांना संपवून टाकू, अशा आशयाचे धमकीपत्र आल्याने खळबळ उडाली होती.

सदर बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्याने सुशेन महाराज नाईकवाडे चांगलेच हादरले. त्यांनी तात्काळ राहुरी पोलिसांशी संपर्क साधून या घटनेत माझा काडीमात्र संबंध नसल्याचे सांगितले. यापूर्वीही माझ्याबाबत अशा तीन घटना घडल्या आहेत. त्यामुळे यावेळी घटनेल्या घटनेचा मी गांभीर्याने विचार करत जिल्हा पोलीस प्रमुखांसह राहुरी पोलीस ठाण्यात सदर धमकीपत्र पाठवणार्‍या अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, मी महाराष्ट्रभरात व्याख्याने, किर्तने तसेच भाषण शिकवणीचे वर्ग घेत असून अहमदनगर शहरामध्ये देखील भाषणाचे क्लास सुरू आहेत.

माझ्यावर सुडबुद्धीतून व बदनामी करण्याच्या उद्देशाने सदर प्रकरणी माझे नाव टाकून निनावी पत्र पाठवले असल्याचा संशय व्यक्त करून याबाबत संशयिताचे नावे मी एक महिन्यापूर्वी राहुरी पोलिसांकडे तक्रार दिली होती असा दावा केला. तपासी पोलीस कर्मचार्‍यांनी अद्याप त्या संशयिताची साधी चौकशी देखील केली नसल्याने तब्बल एक महिन्यानंतर माझा पुन्हा तोच जबाब नोंदवून घेतल्याने या चौकशीत तपासी पोलीस कर्मचार्‍याबाबत संशय व्यक्त होत असल्याचा आरोप नाईकवाडे यांनी केला आहे.

सुशेन महाराज नाईकवाडे यांचा संबंध नाही

आत्महत्याग्रस्त पोलीस हवालदार भाऊसाहेब आघाव यांच्या कुटुंबियांना सुशेन महाराज नाईकवाडे यांच्या नावे आलेल्या धमकीपत्राचा तपास केला केला असता यामध्ये प्रथमदर्शनी नाईवाडे महाराज यांचा कुठलाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आढळून येत नसल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे. मात्र, या घटनेचा तपास सुरू असून यामधील आरोपीस पोलीस पकडून सत्य समोर येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या