Friday, May 3, 2024
Homeनगरपोट भरण्यासाठी राजकीय पदाधिकार्‍यांकडून वाळूतस्करी

पोट भरण्यासाठी राजकीय पदाधिकार्‍यांकडून वाळूतस्करी

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

शासकीय लिलाव बंद पडल्यात जमा झाल्याने पोट भरण्यासाठी राजकीय पदाधिकार्‍यांनी वाळू तस्करी जोरदार सुरू केली आहे. या राजकीय पुढार्‍यांनी अधिकार्‍यांनाही हाताशी धरून रात्री बे रात्री वाहने चालविण्याचा जणू परवानाच मिळविला आहे. प्रवरा नदीपात्रातून आजमितीला 8 पिक अप आणि 5 टाटा सुमो या वाहनांमधून वाळूतस्करी केली जाते. तर छोट्या वाहनांसह गाढवं, बैलगाड्या यांचाही वापर वाळू तस्करीसाठी केला जात आहे. या तस्करीकडे दुर्लक्ष करत महसूलचे अधिकारी धृतराष्ट्राच्या भूमिकेत दिसत आहे.

- Advertisement -

खांडगाव, निमज, वाटीचा डोह, कासारवाडी, मंगळापूर, चिखली, जवळेकडलग, वेल्हाळे, वाघापूर ही प्रवरानदीची काळं सोनं देणारी ठिकाणे तस्करीमुळे नेहमीच चर्चेत असतात. या ठिकाणी वाळूतस्करांनी उच्छाद मांडला आहे. यापूर्वी शासकीय लिलावामार्फत वाळू उपसा केला जात होता. पहाटे 6 ते सायंकाळी 6 पर्यंत वाळूचे लिलाव चालत होते. आता मात्र कुठेही लिलाव नसताना सर्रास बेकायदेशिर वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

रात्री 11 नंतर पिकअप वाले वाळू उपसा सुरू करतात, पहिले वाळूतस्कर आप्पाची गाडी निघाली का नाही, याचा अंदाज घेतात. अंदाज घेतल्यानंतर आपआपल्या ठिकाणी वाळू उपसा करण्यासाठी वाहने पाठविली जातात. सदर आप्पांना वाळू तस्करांकडून फोन केला जातो. आप्पा तुम्ही कुठे आहात? मग वाळू तस्करांना आप्पा सांगतो की मी या ठिकाणी आहे, तुम्ही याठिकाणी येऊन भेटा त्यानंतर तलाठी आपल्या वाहनातून उतरुन तस्कराशी हातमिळवणी झाल्यावर ती गाडी सदर काळं सोनं देणार्‍या ठिकाणांहून फिरते. सर्व बंद असल्याचा निरोप अधिकार्‍यांना पोहच केला जातो. त्यानंतर दोन्ही अधिकारी निद्रावस्थेला जातात.

मात्र या अधिकार्‍यांच्या घराच्या आसपास तस्करांच्या पंट्टरांची पाळत असते. ते साहेब कधी निघणार याची तंतोतंत माहिती तस्काराला देतात. ये रे माझ्या मागल्याप्रमाणे महसूलच्या आप्पाप्रमाणेच पोलिसांचेही फारसे वेगळे नाही. तेही या सर्व ठिकाणी फिरतात. सर्वच अलबेल आहे, असे दाखवत खिसा गरम करून हा पिवळा दिवा देखील रात्रीचा विझलेला दिसतो. महसूलचा ‘आप्पा’ गाडीसह घाटाच्या वर निघून जातो आणि थेट पहाटेच खाली येतो. त्यामुळे रात्रभर वाळू तस्कर प्रवरा नदीपात्रातून चांगलेच हात धुवून घेत असतात.

आता ही वाळू तस्करी राजरोसपणे सुरू असून देखील अधिकारी गप्प का? असा प्रश्न पडतो. एकूणच काय तर राजकीय पुढार्‍यांनाही पोटासाठी नदीपात्र पायाखाली घालावे लागत असल्याने ‘वाळू तस्करांच्या नावानं चांग भलं’ असे वातावरण दिसून येत आहे.

तस्करांना अधिकार्‍याचा ‘थम’ आणि ‘टीक’

राजकीय वाळू तस्कारांना एका अधिकार्‍याकडून ‘थम’ दिला जातो तर दुसर्‍याकडून ‘टीक’ दिली जाते. आप्पांचाही वाहनाप्रमाणे आकडा ठरलेला असतो. पिकअपचा 2, सुमोचा दीड, असा सिग्नल ठरलेला असताना बैलगाडी, गाढवं यांच्या सहाय्याने होणार्‍या वाळूतस्करीला मात्र मुभा आहे. पकडलेली बैलं व गाढवं यांना ठेवायचे कुठे? त्यांना चारा कोण टाकणार? असा प्रश्न महसूलपुढे असल्याने तस्करांनी देखील या जनावरांचा पुरेपुर वापर सुरू केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या