मुंबई | Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल (रविवारी) हैदराबादमधील जनसभेला संबोधित करताना देशवासियांना सोने खरेदी न करणे, परदेश दौरे कमी करणे आणि पेट्रोलचा वापर कमी करण्याचे आवाहन केले होते. तसेच कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ वाढवण्यासही सांगितले होते. पंतप्रधान मोदी यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय (Political) वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी “सरकारकडून दिले जाणारे हे सल्ले नसून गेल्या काही वर्षांतील धोरणात्मक अपयशाचे संकेत आहेत”, असे म्हणत मोदी सरकारवर जोरदार टीका केली. दरम्यान राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. “देशामध्ये सर्वाधिक रिजेक्टेड नेता म्हणजे राहुल गांधी आहेत. रिजेक्टेड मालाला आम्ही महत्त्व देत नाही. त्यांना दोष देता येत नाही, कुठेतरी त्यांची समज कमी आहे,” अशा शब्दांत फडणवीस यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.
हे देखील वाचा : Rahul Gandhi On PM Modi : पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आवाहनानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “देश चालवणे आता ‘कॉम्प्रमाईज्ड’…”
तसेच “फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना (Citizen) इंधनाचा संयमित वापर करण्याचे आवाहन केले होते. यामागचा उद्देश परकीय चलनाची बचत करणे आणि देशाची आर्थिक स्थिती अधिक मजबूत करणे हा असल्याचे स्पष्ट केले. तर देशाला पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. आपण आज जे इंधन वापरत आहोत, त्यामागे पंतप्रधान मोदींचे दूरदृष्टीचे धोरण आहे”, असेही ते म्हणाले.
राहुल गांधी काय म्हणाले होते?
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी एक्सवर पोस्ट करत (ट्विट) पंतप्रधान मोदींच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, “मोदीजींनी काल जनतेकडे त्यागाची मागणी केली. सोने खरेदी करू नका, परदेशात जाऊ नका, पेट्रोलचा वापर कमी करा, खते आणि खाद्यतेलाचा वापर कमी करा, मेट्रोने प्रवास करा, घरून काम (Work from home) करा. हे उपदेश नाहीत – हे अपयशाचे पुरावे आहेत. १२ वर्षांत देशाला अशा वळणावर आणून ठेवले आहे की, जनतेला सांगावे लागत आहे – काय खरेदी करावे आणि काय करू नये, कुठे जावे आणि कुठे जाऊ नये. स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी आणि उत्तरदायित्वापासून वाचण्यासाठी दरवेळी ते दोष जनतेवर ढकलून देतात. देश चालवणे आता ‘कॉम्प्रमाईज्ड’ (तडजोड केलेल्या) पंतप्रधानांच्या हातातील गोष्ट राहिलेली नाही.” असे राहुल गांधी म्हणाले आहेत.





