नाशिक | Nashik
काँग्रेस पक्षाच्या (Congress Party) ‘संघटन सृजन अभियाना’अंतर्गत गेल्या दहा दिवसांपासून नाशिकमध्ये (Nashik) राज्यातील ७८ जिल्हाध्यक्षांचे निवासी प्रशिक्षण शिबीर सुरू आहे. या शिबीराच्या समारोपासाठी राहुल गांधी बुधवारी (दि.२) रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. राहुल गांधी यांचे बुधवारी सकाळी ९ वाजता ओझर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते थेट गंगापूर धरणालगतच्या एमटीडीसी रिसॉर्टमध्ये जाऊन शिबिराला संबोधित करतील.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या दौऱ्याबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली असली, तरी ते आंदोलनस्थळी भेट देऊन आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकतात किंवा मोर्चाच्या प्रतिनिधींशी चर्चा करू शकतात, अशी माहिती समोर आली आहे. आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळांमधील सुविधा आणि पोषण आहाराबाबत काढलेल्या वादाग्रस्त शासन निर्णयाविरोधात (GR) राज्यभरातील आदिवासी युवक व विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
शासनाने (Government) या आदेशाला घाईघाईने स्थगिती दिली असली, तरी विद्यार्थ्यांचा (Student) रोष शमलेला नाही. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. १) नाशिक येथील आदिवासी आयुक्तालयावर राज्यव्यापी भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, या शिबीरासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते नाशिकमध्ये ठाण मांडून आहेत. एकीकडे आदिवासी विद्यार्थ्यांचा महामोर्चा आणि दुसरीकडे राहुल गांधी यांची संभाव्य भेट, यामुळे नाशिकमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
आदिवासी आयुक्तालयावर राज्यव्यापी मोर्चाची जोरदार तयारी
राज्याच्या विविध भागांतून हजारो आदिवासी बांधव, विद्यार्थी आणि युवक नाशिकमध्ये दाखल होत आहेत. आंदोलकांनी आदिवासी आयुक्तालयासमोरच भव्य स्टेज उभारला असून, मोर्चाची पूर्ण तयारी झाली आहे. शासन निर्णय पूर्णपणे रद्द व्हावा आणि आश्रमशाळांमधील सुविधा पूर्ववत व्हाव्यात, या मागणीवर आंदोलक ठाम आहेत.




