कोलकत्ता | वृत्तसंस्था | Kolkata
महाराष्ट्रातील ‘शिवसेना-राष्ट्रवादी’च्या बंडाचा पॅटर्न पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळाला असून, माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षात उभी फूट पडली आहे. पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले आमदार ऋतब्रता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ५९ आमदारांनी एकत्र येत बंडखोरी (Rebellion) केली आहे. तसेच या बंडखोर आमदारांनी ऋतब्रता बॅनर्जी यांची विधिमंडळ पक्षनेते म्हणून घोषणा केली आहे. त्यांनी आज (दि. ३ जून) विधानसभा अध्यक्ष रतिंद्र बोस (Ratindra Bos) यांची भेट घेऊन आपल्या समर्थनाचे पत्र त्यांना सुपूर्द केले.
महिनाभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला ८० जागांवर विजय (Won) मिळाला होता. मात्र, त्यांना आपली १५ वर्षांची सत्ता गमवावी लागली. तर भाजपने २०७ जागा जिंकत घवघवीत यश मिळविले. यानंतर शुभेंदु अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ (CM Oath) घेतली. मात्र, आता या निवडणुकीनंतर लगेचच ममता बॅनर्जी यांच्या पक्षात मोठी फुट पडली असून, ५८ आमदारांनी त्यांची साथ सोडली आहे. त्यामुळे आता बॅनर्जी यांच्याकडे आता फक्त २२ आमदार उरले आहेत.
दरम्यान, बंडखोर गटाकडून ऋतब्रता बॅनर्जी (Ritabrata Banerjee) यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर जावेद खान, संदीपान साहा आणि सिउली साहा यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अख्रुझमान यांची मुख्य प्रतोद (चीफ व्हीप) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच बंडखोर गटाने आपल्या पत्रात अजूनही ममता बॅनर्जी यांनाच पक्षाध्यक्ष मानतो असे म्हणत अभिषेक बॅनर्जी यांचे नेतृत्व आणि विधिमंडळ पक्षाशी संबंधित निर्णय स्वीकारत नाही, असेही म्हटले आहे.
विधानसभा अध्यक्षांची आमदारांच्या गटाला मंजुरी
पश्चिम बंगालचे विधानसभा अध्यक्ष रतिंद्र बोस (Ratindra Bos) यांची तृणमूल काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले आमदार ऋतब्रता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ५९ आमदारांनी भेट घेऊन आपल्या समर्थनाचे पत्र त्यांना सुपूर्द केले होते. त्यानंतर आता विधानसभा अध्यक्षांनी या आमदारांच्या गटाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता पश्चिम बंगालच्या विधानसभेत ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा एक गट दिसणार आहे. तसेच या बंडखोर आमदारांनी ऋतब्रता बॅनर्जी यांची विधिमंडळ पक्षनेते म्हणून घोषणा केली होती.
ऋतब्रत बॅनर्जी नेमके कोण?
तृणमूल काँग्रेसचे बंडखोर आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांचा राजकीय प्रवास नाट्यपूर्ण राहिला आहे. अतिशय कमी वयात राज्याच्या राजकारणात यशस्वी झालेल्या नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. कोलकात्याच्या आशुतोष महाविद्यालय आणि कोलकाता विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या ऋतब्रत बॅनर्जी यांनी २००० च्या दशकात माकपची विद्यार्थी संघटना एसएफआयच्या माध्यमातून राजकारणात पाऊल टाकलं. ते जवळपास ८ वर्षे एसएफआयटचे राष्ट्रीय महासचिव राहिले. डाव्या पक्षातील प्रभावी नेते अशी त्यांची ओळख होती. २०१४ मध्ये माकपनं त्यांना वयाच्या अवघ्या ३४ व्या राज्यसभेवर पाठवलं. पण २०१७ मध्ये पक्षाच्या विचारसरणीविरोधात जात आलिशान जीवनशैली जगू लागलेल्या ऋतब्रत बॅनर्जी यांना माकपनं निलंबित केलं. पक्षाच्या नेतृत्त्वाविरोधात त्यांनी विधानं केली होती. यानंतर त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. ममता बॅनर्जी यांनी त्यांना ट्रेड युनियन विंगचं प्रदेशाध्यक्षपद दिलं. २०२४ मध्ये तृणमूल काँग्रेसनं त्यांना राज्यसभेवर पाठवलं. २०२६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी उलुबेरिया पूर्व मतदारसंघातून तृणमूलच्या तिकिटावर विजय मिळवला. आमदार झाल्यावर त्यांनी दिल्लीतील बंग भवनात मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांची भेट घेतली. यानंतर ममतांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. आता ऋतब्रत बॅनर्जी तृणमूल काँग्रेसच्या ५९ आमदारांच्या पाठिंब्यानं पक्षावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
संदीपन साहा नेमके कोण?
तृणमूल काँग्रेसचे बंडखोर आमदार यांचा राजकीय प्रवास ऋतब्रत बॅनर्जी यांच्या तुलनेत शांत राहिला आहे. पण त्यांचं राजकारण अतिशय मजबूत आहे. त्यांना राजकीय वारसा आहे. कोलकात्यामधील मुरब्बी नेते आणि माजी आमदार स्वर्ण कमल साहा यांचे पुत्र ही संदीपन यांची प्रमुख ओळख आहे. राजकारणात येण्याआधी ते व्यावसायिक होते. त्यांनी आयआयएम कोलकात्यामधून पीजीडीएमची पदवी मिळवली. यानंतर काही दिवस कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये नोकरी केली. कोलकाता महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. हळूहळू त्यांनी संघटनेवर मजबूत पकड निर्माण केली. २०२६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी एंटाली मतदारसंघातून बाजी मारली. त्यांनी पहिल्यांदाच विधानसभेत पाऊल टाकलं. ऋतब्रत बॅनर्जीदेखील पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. पहिल्यांदाच आमदार झालेल्या या दोन नेत्यांनी तब्बल १५ वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या ममता बॅनर्जींना नाकीनऊ आणले आहेत.




