नवी दिल्ली | New Delhi
संसदेचे हिवाळी अधिवेशन (Winter Session of Parliament) सुरु असून, विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडत आहेत. तर विविध कामानिमित्त विरोधी पक्षांचे खासदार केंद्रीय मंत्र्यांची भेट घेत आहे. या पार्श्वभूमीवर आज (मंगळवारी) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदारांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या नेतृत्वात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शौर्य पाटील मृ्त्यूप्रकरणासह संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली.
राष्ट्रवादीच्या खासदारांनी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याकडे बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी ठाम मागणी केली. तसेच बीड जिल्ह्यातील स्व. महादेव मुंडे यांच्या खूनप्रकरणी तपासात होत असलेल्या दिरंगाईकडे लक्ष वेधून, मारेकऱ्यांना तातडीने अटक करून कायद्यानुसार कठोर शिक्षा द्यावी, अशी भूमिकाही मांडली.
त्यासोबतच फलटण येथे झालेल्या स्व. डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी लवकरात लवकर तपास पूर्ण करून दोषींवर कारवाई करावी व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशीही मागणी राष्ट्रवादीच्या खासदारांनी केली. तसेच महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांच्या विदारक परिस्थितीची माहिती देऊन, राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून राज्याला भरीव मदत मिळावी, अशी मागणी देखील त्यांनी अमित शाहांकडे केली.
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान (Local Body Election) झालेला हिंसाचार व मोठ्या प्रमाणावर आढळलेल्या रोख रकमा हे लोकशाहीसाठी चिंताजनक असून, याबाबत योग्य ती कठोर कारवाई करावी, अशी भूमिकाही अमित शाहांकडे यावेळी खासदारांनी (MP) स्पष्टपणे मांडली.




