Wednesday, September 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut : अमित शाह मोदींविरोधातही बंड करू शकतात; संजय राऊतांचा खळबळजनक...

Sanjay Raut : अमित शाह मोदींविरोधातही बंड करू शकतात; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

मुंबई | Mumbai

शिवसेनेसह तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) झालेल्या खासदार फुटीला थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. खासदार फोडण्याचे हे अमित शाह (Amit Shah) यांचे देशातील मोठे राजकीय षडयंत्र असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या षडयंत्राचा एक भाग आहेत, असा खळबळजनक दावा राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. या विधानामुळे देशाच्या आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

यावेळी राऊत यांनी अमित शाह यांच्यावर थेट निशाणा साधत त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेवर बोट ठेवले. ते म्हणाले की,” अमित शाह यांना देशाचे पंतप्रधान व्हायचे आहे आणि त्यासाठीच हा सर्व प्रकार सुरू आहे. खासदार आणि प्रादेशिक पक्ष फोडून भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना आव्हान देण्याचे हे मोठे षडयंत्र आहे. या षडयंत्रात त्यांनी एकनाथ शिंदेंनाही (Eknath Shinde) सामील करून घेतले आहे. उद्या अमित शाह हे या खासदारांच्या बळावर मोदींविरोधात बंड करू शकतात”, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे हे अमित शाहांची ‘टेस्ट ट्यूब बेबी’

एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका करताना संजय राऊत यांनी त्यांची तुलना ‘टेस्ट ट्यूब बेबी’शी केली. ते म्हणाले की,”एकनाथ शिंदे ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी आहे. शिंदे गटाला आता चार वर्षे झाली आहेत, परंतु सर्वोच्च न्यायालय अजूनही निर्णय देऊ शकलेले नाही. हे केवळ तुमच्या (अमित शाह) दबावामुळे होत आहे. सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार हातात घेऊन तुम्ही कोणती शिवसेना (Shivsena) असली हे जाहीर करत आहात. तुमच्या दबावामुळेच निवडणूक आयोगाने त्यांना धनुष्यबाण चिन्ह दिले,” असा थेट आरोप राऊतांनी केला.

अमित शाह यांना थेट आव्हान

राऊत म्हणाले की, “जर अमित शाह शिंदेंच्या पक्षाला खरी शिवसेना म्हणत असतील, तर त्यांना शेअर बाजारात जावे लागेल. कारण असली शिवसेना ही ठाकरेंचीच आहे”, असे सांगत राऊत यांनी शाह यांना थेट आव्हान दिले. तसेच हिंमत असेल तर अमित शाह यांनी स्वतः कोर्टात जावे आणि गृहमंत्री म्हणून सांगावे की असली शिवसेना ठाकरेंची नसून शिंदेंची आहे,” असे आव्हानही राऊत यांनी दिले.

देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न

देशात सध्या गोंधळ नाही तर अराजक निर्माण होणार आहे. अमित शाह हे मूळचे व्यापारी आहेत. शेअर बाजारात पैसा गुंतवणे आणि कृत्रिम भाव वाढवून पैसा कमावणे हा त्यांचा मूळ व्यवसाय आहे, सहकार हे त्यांचे ढोंग आहे. त्यांनी देशात अराजक निर्माण करण्याची सुपारी घेतली आहे, असा घणाघातही राऊत यांनी केला.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata बुधवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 305 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 4734 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर...