मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात ठाकरे सेनेचे खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज (रविवारी) ‘मातोश्री’ निवासस्थानी सर्व खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. या बैठकीला काही खासदार प्रत्यक्ष तर काही ऑनलाईन हजर होते. या बैठकीनंतर ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलतांना ‘मातोश्री’ वरील बैठकीला कोणते खासदार हजर होते आणि कोण ऑनलाईन उपस्थित होते याबाबत माहिती दिली.
यावेळी राऊत म्हणाले की, आजच्या बैठकीसाठी सगळे खासदार (MP) उपस्थित होते. यात ‘मातोश्री’वर खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि संजय दीना पाटील यांची हजेरी होती. तर खासदार नागेश अष्टीकर, संजय (बंडू) जाधव, ओमराजे निंबाळकर आणि संजय देशमुख हे ऑनलाइन (Online) उपस्थित होते, अशी माहिती त्यांनी दिली.
खासदार ओमराजे निंबाळकर यांचा मुलगा आजारी असल्याने त्याच्यावर पुण्यातील (Pune) रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे निंबाळकर बैठकीला ऑनलाइन हजार होते. तर शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पत्नी आजारी असल्यामुळे ते या बैठकीला अनुपस्थित होते. तसेच खासदार नागेश पाटील अष्टीकर यांचा मुलगा विधानपरिषद निवडणुकीत उभा असल्याने ते त्याच्या प्रचारात व्यस्त होते.
तर संजय देशमुख यांच्या घरी लग्नाची तयारी सुरु असल्याने ते प्रत्यक्षात बैठकीला हजर नव्हते. मात्र, ऑनलाईन उपस्थित होते. तसेच परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या मतदारसंघात सुरू असलेल्या ‘धोंडे जेवणाच्या’ कौटुंबिक कार्यक्रमामुळे ते प्रत्यक्षात बैठकीला येऊ शकले नाहीत. मात्र, त्यांनी बैठकीला ऑनलाईन हजेरी लावून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा केली अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.
सकाळपासून फोन बंद, पक्षात पसरली होती अस्वस्थता
उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या आजच्या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. पक्षात पडझड होऊ नये यासाठी बोलावण्यात आलेल्या या बैठकीआधीच खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा मोबाईल फोन सकाळपासून बंद येत होता. त्यामुळे ते शिंदे गटाच्या संपर्कात तर नाहीत ना? अशा चर्चांना उधाण आले आणि ठाकरे गटात प्रचंड अस्वस्थता पसरली. मात्र, सर्व चर्चांना पूर्णविराम देत भाऊसाहेब वाकचौरे यांनी बैठकीला ऑनलाईन हजेरी लावली. त्यामुळे सकाळपासून सुरु असलेल्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला.




