नवी दिल्ली | New Delhi
नीट परीक्षेतील (Neet Exam) कथित फेरफार आणि अनियमिततेच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात आज (शनिवारी) सकाळी मोठ्या घडामोडी घडल्या. गेल्या २० दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसलेले प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, पर्यावरणशास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांना दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) शनिवारी ( दि. १८ जुलै) रोजी पहाटे साडेसात वाजताच्या सुमारास आंदोलनस्थळावरून बळजबरीने हटवून रुग्णालयात दाखल केले. या कारवाईनंतर जंतरमंतरवर प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. यानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे.
पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप
सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आंदोलनस्थळी उपस्थित कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. पोलिसांनी जंतर-मंतरवरून इतर कार्यकर्त्यांनाही हटवण्यास सुरुवात केली, ज्याला कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवला. या घटनेनंतर कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी “दिल्ली पोलिसांनी मारहाण केली आणि त्यानंतर ताब्यात घेतले. तसेच सोनम वांगचुक सरांना शिवीगाळ करण्यात आली,” असा आरोप केला आहे.
पंतप्रधान मोदी आणि धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
सोनम वांगचुक यांना हटवल्यानंतर अभिजीत दीपके यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, “मी आजपासून माझे आमरण उपोषण सुरू करत आहे. २० जुलै रोजी आमचा नियोजित मोर्चाही निघेल आणि माझे उपोषणही सुरूच राहील. सोनम सरांना इथून उचलून नेल्याने हे आंदोलन संपवता येईल, असा संभ्रम प्रशासनाला आहे, पण हे आंदोलन संपणार नाही. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
उच्च न्यायालयाच्या सुनावणीपूर्वीच पोलीसांची कारवाई
विशेष म्हणजे, सोनम वांगचुक यांची ढासळती प्रकृती लक्षात घेता दिल्ली उच्च न्यायालयात यासंदर्भात सुनावणी होणार असतानाच पोलिसांनी ही कारवाई केली. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयाने वांगचुक यांच्या खालावणाऱ्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली होती. तसेच प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश देत, वांगचुक यांच्या प्रकृतीची दररोज वैद्यकीय तपासणी सुनिश्चित करण्याचे आदेश दिले होते. असे असतानाही शनिवारी पहाटेच पोलिसांनी त्यांना रुग्णालयात हलवले.




