Sunday, June 21, 2026
Homeब्रेकिंग न्यूजTMC Split : 'तृणमूल'च्या बंडखोर खासदारांनी निवडलेला NCPI पक्ष नेमका कुणाचा? किती...

TMC Split : ‘तृणमूल’च्या बंडखोर खासदारांनी निवडलेला NCPI पक्ष नेमका कुणाचा? किती निवडणुका लढविल्या?

नवी दिल्ली | New Delhi

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील (West Bengal Assembly Elections) पराभवानंतर माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षात मोठी फूट पडली आहे. पक्षाच्या २० बंडखोर खासदारांनी थेट ‘नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ (NCPI) या पक्षात प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. हे बंडखोर खासदार आता केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) पाठिंबा देणार आहेत.

- Advertisement -

या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर देशाच्या राजकीय वर्तुळात ‘एनसीपीआय’ (NCPI) हा नेमका कुठला पक्ष आहे? या पक्षाचा अध्यक्ष कोण? आणि टीएमसीच्या खासदारांनी (TMC MP) याच पक्षाची निवड का केली? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत होणारी अपात्रतेची कारवाई आणि इतर कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी बंडखोर खासदारांनी स्वतंत्र गट न स्थापन करता थेट ‘NCPI’ पक्षात विलीन होण्याचा मार्ग निवडल्याचे बोलले जात आहे.

‘एनसीपीआय’ पक्ष नेमका कुणाचा?

नॅशनल सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ (NCPI) हा प्रामुख्याने ईशान्य भारतातील आसाम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये सक्रिय असलेला एक छोटा प्रादेशिक पक्ष आहे. शिउली कुंडू या पक्षाच्या संस्थापक अध्यक्ष असून, उत्तीय कुंडू हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. एनसीपीआय पक्षाची स्थापना जानेवारी २०२३ मध्ये झाली असून, निवडणूक आयोगाकडे त्याची अधिकृत नोंदणी आहे. पण तो मान्यता नसलेला राजकीयं पक्ष आहे. या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह ‘शाईच्या पेनाची निब आणि सात प्रकाश किरणे’ असे आहे. तसेच या पक्षाचे मूळ केंद्र पश्चिम बंगालमधील हावडा हे शहर आहे. त्रिपुरा या छोट्या राज्यातून २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाने आपले खाते उघडले होते, मात्र त्यावेळी त्यांना अत्यंत नगण्य मते मिळाली होती. दरम्यान आता तृणमूलच्या बंडखोर खासदारांच्या प्रवेशामुळे या छोट्या पक्षाला थेट संसदेत नवसंजीवनी मिळाली आहे.

कशी राहिली आहे NCPI ची निवडणुकीतील कामगिरी

‘नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ने २०२३ मध्ये प्रथमच त्रिपुरा विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत पक्षाने केवळ दोनच जागेवर आपले उमेदवार उभे केले होते. मात्र, या दोन्ही जागेवरील उमेदवारांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यांची अनामत रक्कमही जप्त झाली. उनाकोटी जिल्ह्यातील कैलाशहर मतदारसंघातून जहांगीर अली (वय ५४) आणि धलाई जिल्ह्यातील चावमनू मतदारसंघातून बर्जेदा त्रिपुरा (वय ६५) यांनी एनसीपीआयच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत एनसीपीआयच्या दोन्ही उमेदवारांना एकूण ८२२ मते पडली होती. त्यामध्ये अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या चावमानू मतदारसंघात ५३६ मते, तर कैलाशहर मतदारसंघात पक्षाला अवघ्या २८६ मतांवरच समाधान मानावे लागले होते. विशेष म्हणजे, कैलाशंहर मतदारसंघात तृणमूल काँग्रेसलाही केवळ ६९६ मतांसह तिसऱ्या क्रमांकाची मते पडली होती, जी ‘नोटा’ या पर्यायाला मिळालेल्या ५३७ मतांपेक्षा किंचित जास्त होती. त्याशिवाय चावमानू मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचा उमेदवार ५६६ मतांसह चौथ्या क्रमांकावर राहिला होता.

संसदेत ‘एनडीए’ची ताकद वाढणार; मोठ्या विधेयकांची तयारी?

बंडखोर खासदारांनी एनडीएला जाहीर पाठिंबा दिल्यामुळे संसदेत सत्ताधारी आघाडीचे संख्याबळ वाढणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार ‘एक देश, एक निवडणूक’ (One Nation, One Election) आणि ‘मतदार पुनर्रचना कायदा’ ही महत्त्वपूर्ण विधेयके मंजूर करण्याच्या तयारीत आहे. यासाठीच केंद्र सरकारने ही राजकीय जमवाजमव केल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ताज्या बातम्या