Friday, May 3, 2024
Homeनगरराज्यातील स्थायीसह इतर समित्यांच्या निवडणुकांना स्थगिती

राज्यातील स्थायीसह इतर समित्यांच्या निवडणुकांना स्थगिती

मुंबई – कोरोनामुळे राज्यातील नगरपालिका, महापालिकातील स्थायी समिती आणि इतर समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या निवडणुका दरवर्षी एप्रिलच्या सुरुवातीला होत असतात. जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि मुंबईत आढळून येत आहेत. देशभरातही रुग्णांची संख्या मोठी आहे. नागरिकांनी गर्दी करू नये आणि विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे एप्रिलच्या सुरुवातीला होणार्‍या महापालिका, नगरपालिका, नगर पंचायतमधील स्थायी, विषय समित्या व सदस्य निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.

राज्याच्या नगर विकास विभागाने तसे पत्र सर्व विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त व जिल्हाधिकार्‍यांना पाठवले आहे. पुढील आदेश येईपर्यंत या निवडणुकांना स्थगिती असेल, असे राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने आपल्या पत्रात सांगितले आहे. दरम्यान जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे महाराष्ट्रात 159 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 86 रुग्ण मुंबई आणि परिसरातील आहेत. देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली. त्यानंतरही नागरिक रस्त्यावर उतरत असल्याने कर्फ्यू लावण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊन केले आहे. 14 एप्रिलपर्यंत 21 दिवसांचा लॉकडाऊन असून यापुढेही कोरोनावर नियंत्रण मिळवता आले नाही तर हा लॉकडाऊन आणखी काही काळ वाढवला जाऊ शकतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या