अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शिक्षण हा प्रत्येकाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. सुशिक्षित व्यक्ती देशाला चांगले आणि मजबूत बनवण्यात योगदान देते. भारतात सरकारी शाळांमध्ये शिकणारी अनेक मुले आहेत. सरकारी शाळांमध्ये गरीब श्रीमंत असा कोणतही भेदभाव न करता सर्वानाच शिक्षण दिले जाते. याच सरकारी शाळेत शिकणार्या मुलांसाठी मोदी सरकारने एक विशेष योजना आणली आहे. भारतात अशा अनेक शाळा आहेत, ज्या अनेक वर्षांपूर्वी बांधल्या गेल्या आहेत. याच शाळांना आधुनिक बनवण्यासाठी मोदी सरकारने प्रधानमंत्री श्री शाळा योजना सुरू केली आहे. श्री शाळा योजनेमधून विकसित झालेल्या शाळा इतर सामान्य शाळांपेक्षा वेगळ्या असणार आहेत.
भारत सरकारने 2022 मध्ये एक योजना सुरू केली होती. या योजनेचे नाव पीएम श्री म्हणजेच पीएम स्कूल फॉर रायझिंग इंडिया असे होते. पीएम श्री स्कूल योजना म्हणून ही योजना ओळखली जाते. या योजनेअंतर्गतच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 राबविण्यात येणार आहे. पीएम श्री स्कूल योजनेंतर्गत नगर जिल्ह्यात 28 शाळा विकसित करण्याचे काम सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या शाळा बांधल्या जाणार आहेत.
पीएम श्री स्कूल योजनेंतर्गत बांधल्या जाणार्या शाळांमध्ये डव्हान्स टेक्नॉलॉजीची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळणार आहे. या योजनेचा लाखो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. सरकारी शाळांमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांना हव्या त्या प्रमाणात सुविधा मिळत नाहीत. कोणत्याही खाजगी शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांना मात्र अत्याधुनिक सुविधा मिळतात. मात्र, भारत सरकारच्या पीएम श्री योजनेंतर्गत आता सरकारी शाळा आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केल्या जाणार आहेत.
यामध्ये भौतिक पायाभूत सुविधा मजबूत केल्या जाणार आहेत. मुलांचे वर्ग. खोल्या अधिक चांगल्या पद्धतीने बनवल्या जातील. प्रत्येक शाळेत प्रयोगशाळेची व्यवस्था केली जाणार आहे. यासोबतच मुलांना विविध विषयांचे व्यावहारिक ज्ञान दिले जाणार आहे. तसेच, व्हीआर हेडसेट, बहुभाषिक पेन ट्रान्सलेटर, व्हिडीओ रेकॉर्डिंग लॅब आणि खेळासाठी चांगले कॉम्प्लेक्सही तयार केले जाणार आहेत. तर, अंध विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.
नगर जिल्ह्यात पीएम श्री योजनेत 28 शाळांची निवड करण्यात आलेली आहे. या ठिकाणी करण्यात आलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी लवकर केंद्र सरकारचे पथक जिल्ह्यात येणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे. या योजनेत राबवण्यात आलेल्या उपक्रम, त्यांची फलनिश्चितीत याची पाहणी केंद्रीय पथकाकडून करण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यात या योजनेत 28 शाळांची निवड करण्यात आलेली आहे.
या आधार स्तंभावर शाळांचा विकास
या शाळांचा विकास प्रामुख्याने पुढील 6 प्रमुख आधार स्तंभांवर केला जाईल. अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र व मुल्यमापन; प्रवेश आणि पायाभूत सुविधा; मानव संसाधन आणि शालेय नेतृत्व; समावेशक पद्धती आणि लैंगिक समाधान; व्यवस्थापन, देखरेख आणि प्रशासन; लाभार्थी समाधान.
या शाळांमध्ये पीएम श्री योजना गणोरे (ता. अकोले), झेडपी स्कूल हाळगाव आणि धोत्री (ता. जामखेड), झेडपी शाळा मिरजगाव मुली (ता. कर्जत), झेडपी शाळा रवांदे, (ता. कोपरगाव), डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल, भिंगार, नगर, झेडपी शाळा बुर्हाणनगर, जिल्हा परिषद शाळा निंबळक (ता. नगर), झेडपी शाळा भेंडा आणि नेवासा उर्दू (ता. नेवासा), झेडपी शाळा देवीभोयीरे, राळेगण थेरपी (ता. पारनेर), झेडपी शाळा पाथर्डी मुले, टाकळीमानूर (ता. पाथर्डी), झेडपी शाळा राहाता उर्दु, शिर्डी आणि शिंगवे (ता. राहाता), झेडपी शाळा देवळाली प्रवरा आणि ब्राम्हणी, झेडपी शाळा सारोळा पठार (ता. संगमनेर), झेडपी शाळा सुलतानपूर आणि गणेशनगर (ता. शेवगाव), झेडपी शाळा पिसोरे खांड, श्रीगाेंंदा मुले, श्रीगोंदा मुली (ता. श्रीगोंदा), झेडपी शाळा गोंडेगाव आणि न. पा. शाळानंबर 7 (ता. श्रीरामपूर) आणि जिल्हा परिषद शाळा केडगाव (नगर मनपा) या शाळांचा समावेश आहे.




