अहिल्यानगर । प्रतिनिधी
ईव्हीएम मशिनमधील डेटाची तपासणी आणि पडताळणीसाठी अर्ज दाखल केलेले राहुरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी या प्रक्रियेतून माघार घेतली आहे. तसा अर्ज त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
दरम्यान, त्यांनी ५ केंद्रांतील ईव्हीएमविषयी शंका उपस्थित केली होती. त्यासाठी त्यांनी २ लाख ३६ हजार रुपये भरले होते. माघार घेतल्याने त्यांना भरलेले शुल्क देखील परत मिळणार आहे.
विधानसभा मतदारसंघातील पराभूत दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाची मते घेतलेल्या उमेदवारांना निकालानंतर ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी ७ दिवसांची मुदत दिली जाते. २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर झाला असताना ३० नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीत मुदतीच्या जिल्ह्यातील बारापैकी दहा मतदारसंघातील उमेदवारांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला होता.
यामध्ये संगमनेरमधून बाळासाहेब थोरात यांनी १४, शिर्डीतून प्रभावती घोगरे यांनी २, कर्जत-जामखेडमधून राम शिंदे यांनी १७, नेवाशातून शंकरराव गडाख यांनी १०, राहुरीतून प्रजाक्त तनपुरे यांनी ५, पारनेरमधून राणी लंके यांनी ५, कोपरगावातून संदीप वर्षे यांनी १, पाथर्डी-शेवगावमधून प्रताप ढाकणे यांनी २, अहमदनगरमधून अभिषेक कळमकर यांनी ३ व श्रीगोंद्यातून राहुल जगताप यांनी २ अशा ७४ ईव्हीएम व व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी अर्ज करण्यात आले होते.
१० पराभूत उमेदवारांनी ४७ हजार २०० रूपये प्रतिमशीनसह शुल्काची रक्कमही भरली होती. मात्र या प्रक्रियेत व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी होणार नसल्याचे स्पष्ट होताच प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज सादर केला. त्यानुसार या प्रक्रियेसाठी केलेला अर्ज रद्द केला जाणार असून त्यांना भरलेले शुल्क परत दिले जाणार आहे.