राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
हिंदूस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबनेची घटनेला तीन ते चार दिवस होऊनही पोलिसांनी आरोपींना अद्यापही अटक केलेली नाही. घटनेतील आरोपींना 1 एप्रिल 2025 पर्यंत अटक न केल्यास राहुरी शहर बेमुदत बंद ठेवण्यात येईल, असा इशारा माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे. माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात बोलाविलेल्या दुरदृष्य प्रणालीद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले, राहुरी शहरातील बुवासिंदबाबा तालीमित 26 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती. या घटनेच्या निषेधार्थ शहरातील सकल हिंदू धर्मीय युवकांनी एकत्र येऊन नगर-मनमाड राज्य मार्ग अडवला होता.
व्यापारीपेठ या घटनेमुळे बंद झाली होती. त्यानंतर पोलिसांना निवेदन देण्यासाठी सर्व आंदोलक पोलीस स्टेशनला जमा झाले. त्यावेळी पोलिसांनी दोन दिवसांमध्ये आम्ही आरोपीला शोधून काढू आणि गुन्हे दाखल करू असे आश्वासन दिले होते. तसेच गुरुवारी आठवडे बाजार असताना एक दिवस राहुरी शहर बंद ठेवले. दुसरे दिवशी परत शहर बंद होणार होते. परंतु व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पारख यांनी पोलिसांनी दोन दिवसाची मुदत मागितली त्याप्रमाणे होऊ द्या नाही असे सांगीतल्याने बंद मागे घेण्यात आला. घटनेला तीन दिवस होऊन सुद्धा अ आरोपीला अटक झाली नाही. कोणत्याही संशयितला किंवा आरोपीला ताब्यात घेतले नाही, ही मोठी गंभीर बाब आहे. आता सणासुदीचे दिवस आहे. पोलीसांना अजून दोन दिवसांची मुदत देऊ, त्यानंतर 1एप्रिल 2025 पासून बेमुदत राहुरी शहर बंद ठेवणार आहोत. या घटनेचे गांभीर्य सरकारला व पोलीस खात्याला नसेल तर कुठल्या गोष्टींचे गांभीर्य असणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अवमान होतोय. राज्यात एकामागे एक घटना होत आहेत. खरं एकनाथ शिंदे यांचे सरकार असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सहा महिन्यांमध्ये बांधून कोसळतो काय? त्यानंतर राहुल सोलापूरकर शिवाजी महाराजांबद्दल सातत्याने बोलतात, ते शिवाजी कर्डिले यांच्या प्रचार सभेला आले होते. ते महाराजा बद्दल अपशब्द वापरतात. कोरटकर नावाची व्यक्ती शिवाजी महाराजांवर एकेरी भाषेत टिका करतात. त्याला पकडायला देखील पोलिसांना जवळपास पंधरा-वीस दिवस नव्हे तर महिना गेला. छत्रपती शिवाजी महाराजांना तर कोणी उठतंय कोणी उठ सुटतो आणि टार्गेट करतो. आणि पोलीस प्रशासनाकडून काही कारवाई होत नाही. पण आम्ही मात्र आता स्वस्थ बसणार नाही. जे आरोपी असतील ते तात्काळ पोलिसांनी ताब्यात घ्यावे. आता अजून दोन दिवसांमध्ये जर काही झालं नाही तर राहुरी शहरांमध्ये कडकडीत बंद ठेवण्यात येईल असा इशारा माजी मंत्री तनपुरे यांनी दिला.
बुवासिंदबाबा तालीम ही राहुरी नगरपालिकेची आहे. तालमीची जबाबदारी नगरपालिकेची आहे. मुख्याधिकारी हे आता प्रशासक असल्याने सर्वस्वी ते जबाबदार आहेत. त्या वास्तूमध्ये मूर्ती ठेवायला परवानगी घेतली होती का? घेतली असेल तर ती तिची काळजी घेतली गेली होती का? त्याकरता काही व्यवस्था ठेवली होती का? म्हणून मुख्याधिकार्यांचा देखील यामध्ये निष्काळजीपणा या घटनेला कारणीभूत आहे का? याची देखील पोलिसांनी चौकशी करावी. नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांवर देखील गुन्हा करावा. त्यांना देखील शासनाने निलंबित केलं पाहिजे, अशी मागणी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली.