Tuesday, February 3, 2026
HomeनगरSangamner : आमदार खताळांकडून माझ्या मुलाची आर्थिक फसवणूक

Sangamner : आमदार खताळांकडून माझ्या मुलाची आर्थिक फसवणूक

आरोपीच्या आईची संगमनेर शहर पोलिसांत तक्रार

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ या आरोपीवर गुन्हा दाखल करत पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर हा हल्ला राजकीय षडयंत्रातून झाला असल्याचे आरोप खताळ समर्थकांनी केले असून मोर्चा देखील काढण्यात आला. मात्र आता आरोपी प्रसाद याची आई अनिता गुंजाळ यांनी संगमनेर शहर पोलिसांना आमदार खताळ यांच्याकडून माझ्या मुलाची आर्थिक फसवणूक करण्यात आल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचा लेखी तक्रार अर्ज दिला आहे. यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

सदर तक्रार अर्जात अनिता आप्पासाहेब गुंजाळ यांनी म्हटले आहे, की मी प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ याची आई आहे. दोन दिवसांपूर्वी घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून, मी त्या घटनेचं समर्थन करत नाही. या घटनेचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही. या घटनेचं राजकारण झालं तर आम्हाला न्याय मिळणार नाही. झालेली घटना ही आर्थिक देवाण-घेवाण आणि माझ्या मुलाच्या झालेल्या आर्थिक फसवणुकीतून घडलेली आहे. माझ्या मुलाला अमोल खताळ यांनी फसवलेलं आहे. त्याच्याकडून सह्या केलेले कोरे चेक पुस्तक घेऊन गेलेले आहेत.

YouTube video player

त्यामुळे मागील वर्षभरापासून माझा मुलगा प्रचंड मानसिक तणावात होता. वारंवार घरी पोलीस गाड्या पाठवून, त्याला ब्लॅकमेल केले गेले, त्याच्यावर दबाव टाकला गेला. त्याने बर्‍याचवेळा आत्महत्येचाही विचार केला. अमोल खताळ आणि प्रसाद गुंजाळ हे अनेक वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत. प्रसाद हा अमोल खताळ यांचा घरगुती मेंबर असल्यासारखा होता. अनेक कौटुंबिक कार्यक्रम त्यांनी एकत्र साजरे केलेले आहेत. वाढदिवसही त्यांनी एकत्र साजरे केलेले आहेत. माझ्या मुलाबरोबर अमोल खताळ यांचे बरेच आर्थिक व्यवहार होते. प्रसाद हा शेअर मार्केटमध्ये काम करायचा, त्यामध्ये गुंतवणुकीसाठी अमोल खताळ यांच्या मध्यस्थीने आणि त्यांच्यासमोरच काही आर्थिक देवाण-घेवाण झालेली आहे. यातील बरेच व्यवहार रोखीने झालेले होते, तसेच त्याची नोटरीही झालेली आहे.

सदर देवाण-घेवाण अमोल खताळ यांच्या कार्यालयातच झालेली आहे व ती रोख स्वरूपात झालेली आहे, हे सर्व कागदपत्रे आमच्याकडे उपलब्ध आहेत. मी या तक्रारीसोबत ते जोडत आहे. या सगळ्या संदर्भाने संगमनेर पोलीस स्टेशनमध्येच 2024 मध्ये अमोल खताळ, तेव्हाचे मथुरे साहेब, माझे पती, मुलगा आणि ज्यांना पैसे द्यायचे आहे त्यांची एकत्रित बैठकही झाली होती. पोलिसांना ते सर्व ठाऊक आहे. शेअर बाजारात मुलाला अपयश आल्यानंतर लोकांचे देणे देण्यासाठी मी त्याला त्याच्या वाट्याची जमीन दिली, ती त्यांनी विकली व त्यातून लोकांचे दिले. पैसे त्याने चेकने बँकेच्या अकाऊंटवरूनच परत केलेले आहे. तरीही बँकेत त्यांच्याकडे असलेले चेक पुन्हा टाकून त्याला फसवले गेले.

मागील काही दिवसांपासून त्याला सातत्यानं धमक्या दिल्या जात होत्या, त्याला ब्लॅकमेल केलं जात होतं, त्याच्यावर दबाव टाकला जात होता, तो प्रचंड मानसिक तणावात होता. याशिवाय माझा मुलगा गेल्या अनेक दिवसांपासून सारखा अमोल खताळ यांना भेटायचा आणि माझा विषय मिटवून द्या असे सांगायचा. शेवटी उद्विग्न अवस्थेतून त्याने हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे. मी त्याचे कोणतेही समर्थन करणार नाही. मात्र त्याला या टोकापर्यंत पोहोचायला भाग पाडणार्‍यांना मी आई म्हणून कधीही माफ करणार नाही. यामुळे आमची प्रचंड बदनामी झाली असून, जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यास आमदार अमोल खताळ, संदेश देशमुख आणि त्यांचे सहकारी जबाबदार असतील, असे अनिता गुंजाळ यांनी तक्रारीत म्हटले आहे.

आर्थिक व्यवहारांचा उपयोग राजकारणासाठी करु नये

रवींद्र देशमुख यांचा कायदेशीर मार्ग अवलंबविण्याचा इशारा

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ यांच्याशी झालेले आमचे सर्व आर्थिक व्यवहार हे व्यक्तीगत आहेत. या व्यवहारामध्ये आमदार अमोल खताळ यांचा कोणताही संबंध नाही. मात्र राजकीय हेतूने त्यांची बदनामी करण्यासाठी आमच्या आर्थिक व्यवहारांचा कोणताही उपयोग राजकारणासाठी करु नये, अन्यथा आम्हालाही कायदेशीर मार्ग अवलंबवावे लागतील असा इशारा प्रसाद गुंजाळ यांच्याशी आर्थिक व्यवहार केलेले रवींद्र ज्ञानदेव देशमुख यांनी दिला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात रवींद्र देशमुख यांनी म्हटले आहे, की प्रसाद गुंजाळ हे शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय करत होते. मागील 20 वर्षांपासून त्यांची आणि माझी मैत्री आणि घनिष्ठ संबंध राहिले. सप्टेंबर 2023 मध्ये प्रसाद गुंजाळ शेअर ट्रेडिंगच्या व्यवसायात आर्थिक अडचणीत सापडल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात देणेदारी झाली. यासाठी त्यांनी 32 लाख 50 हजार रुपयांची रक्कम इतरांची देणेदारी मिटविण्यासाठी मी देवू केली. सदर रक्कम एक महिना टप्प्याटप्प्याने परत करण्याचे आश्वासन दिले होते.

या रकमेचा एक भाग म्हणून 25 ऑक्टोबर, 2023 रोजी 5 लाख रुपये रोख स्वरुपात परत दिली व उर्वरित रक्कम प्रसाद गुंजाळ वेळेत देवू शकले नसल्याने त्यांनी 30 एप्रिल, 2024 रोजी संगमनेर येथील अ‍ॅक्सीस बँक शाखेचा 13 लाख रकमेचा धनादेश क्र.205439 दिला आणि दुसरा धनादेश क्र.205440 नुसार 14 लाख 50 हजार हा 20 मे, 2024 रोजी दिला. मात्र हे धनादेश बँकेच्या खात्यात भरुनही न वटल्याने मी त्यांना अ‍ॅड. एस. एम. जोंधळे यांच्या माध्यमातून 6 जून. 2024 रोजी नोटीस पाठवली. विशेष म्हणजे या सर्व आर्थिक व्यवहारांचा करारनामा 18 मार्च, 2024 रोजी नोटरी पब्लिक अ‍ॅड. डी. एस. वर्पे यांच्या समोरच करण्यात आला होता. झालेल्या फसवणुकीवरुन याबाबतची कायदेशीर प्रक्रिया आता सुरु असल्याचे रवींद्र देशमुख यांनी सांगितले.

प्रसाद गुंजाळ यांच्या आई अनिता गुंजाळ यांनी राजकीय दबावाखाली येवून प्रसिद्ध केलेल्या बातमीतही लोकांची देणेदारी मान्य केली आहे. याचा अर्थ त्यांच्या मुलाचे आर्थिक व्यवहार त्यांना मान्य आहे. वस्तुस्थिती लक्षात घेता माझ्यातील आणि प्रसाद गुंजाळ यांच्यातील झालेले आर्थिक व्यवहार ते मान्य करीत आहे. मात्र या रकमेसाठी प्रसाद गुंजाळ आणि त्यांच्या कुटुंबाकडे मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. मात्र माझे पैसे देण्याऐवजी त्यांनी आर्थिक व्यवहारांना राजकारणाशी जोडून माझी व्यक्तीगत बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. वास्तविक या सर्व व्यवहारात आमदार अमोल खताळ यांचा कुठेही संबंध आलेला नाही. तरीही जाणीवपूर्वक त्यांची बदनामी करण्याचे काम प्रसाद गुंजाळ आणि त्यांच्या कुटुंबियांनी काही राजकीय व्यक्तींच्या दबावाखाली येवून सुरु केले आहे तर स्वामीप्रसाद डाके म्हणाले, प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ यांच्याशी माझे व्यक्तीगत संबंध आले.

त्यांच्या शेअर मार्केटच्या व्यवसायामध्ये माझी कुठलीही गुंतवणूक नाही. मात्र आर्थिक अडचण आल्यामुळे त्यांनी माझ्याकडे एक महिना मुदतीकरीता 50 लाख रुपयांची मागणी केली. वचनपत्र तयार करुन ही रक्कम मी त्यांना दिली. मात्र एक महिना झाल्यानंतरही रक्कम परत न आल्यामुळे त्यांनी मला दिलेला धनादेश 16 ऑगस्ट, 2023 रोजी बँकेत जमा केला. परंतु, स्टॉप पेमेंट या कारणाने हा धनादेश परत आला. मी दिलेली रक्कम मागणी करुनही न मिळाल्याने सध्या या प्रकारणाची न्यायालयीन प्रक्रिया सुरु असल्याचे ते म्हणाले.

ताज्या बातम्या

Ajit Pawar Death : अजित दादांसारख्या लोकनेत्याला कायमचा मुकलो; शोकसभेत सर्वपक्षीय...

0
नाशिक | Nashik स्व.अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्या निधनाने महाराष्ट्र एका लोकनेत्याला कायमचे मुकले आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर त्यांनी आयुष्यभर काम केले. त्यात कुठलीही...