Sunday, May 19, 2024
Homeनगरकैद्याकडून पोलीस कर्मचार्‍याला जिवे मारण्याची धमकी

कैद्याकडून पोलीस कर्मचार्‍याला जिवे मारण्याची धमकी

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

येथील सब जेलमध्ये बंदोबस्तास असलेल्या पोलीस कर्मचार्‍यास खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी संगमनेर येथील उपकारागृहात घडली.

- Advertisement -

संगमनेर येथील उपकारागृहात यापूर्वी अशा घटना अनेकदा घडलेल्या आहेत. शुक्रवारी सायंकाळी थेट पोलीस कर्मचार्‍याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. शुक्रवार दि. 6 रोजी सायंकाळी पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब शिरसाठ हे संगमनेर येथील उपकारागृहामध्ये लॉकअप गार्ड ड्युटीवर बसलेले होते. सायंकाळी 6.30 ते 7.00 वा. चे दरम्यान जेल मधील आरोपींना जेवण येते. नेहमी प्रमाणे आरोपींना जेवण 6.40 वा आले होते. त्यावेळेस पोलीस कॉन्स्टेबल राजू मेंगाळ यांचा ड्युटीचा पहारा चालु होता. त्यावेळेस बाबासाहेब शिरसाठ व सुरेश बाळु मोरे गार्डवर ड्युटी करत होते.

नेहमी प्रमाणे भत्ता देणारा इसम मुन्ना शेख हा डब्बा घेवुन लॉकअप गार्ड मध्ये गेला. तेव्हा त्याचे सोबत पोलीस कॉन्स्टेबल राजू मेंगाळ हे चावी घेवुन गेले व त्यानंतर प्रत्येक बॅरेक मधील एक एक लॉकअप उघडुन जेवणाचे डब्बे मुन्ना शेख देत होता. जेवण देत असतांना 3 नंबर बॅरेक मधील आरोपी विशाल कोते हा जेवण देत असतांना अचानक बॅरेक च्या बाहेर आला व तो बाहेरच थांबला. तेव्हा पोलीस कॉन्स्टेबल शिरसाठ यांनी त्याला आत मध्ये जा, असे सांगितले. बॅरेक मध्ये जा असे म्हणत असताना तो आतमध्ये जात नव्हता. या आरोपीने पोलिसांना शिवीगाळ केल्याने दोघांमध्ये झटापट झाली. तुला व तुझ्या कुटुंबाला मी जिवंतच सोडणार नाही असे म्हणून या आरोपीने मोठ मोठ्याने आरडा-ओरडा करून शिवीगाळ केली. त्याने सरकारी कामात अडथळा आणला.

‘तू जास्त माजला आहे’ असे म्हणून या आरोपीने आरडा ओरडा करुन ड्युटीवर असलेल्या इतर पोलीस कर्मचार्‍यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ‘तुझे सर्व कुटुंब मी जेल मध्ये राहुन संपवुन टाकीन’ अशी धमकी दिली. तुमचे कुटुंबिय बाहेर कसे फिरते ते मी बघतो, मी गेली 10 वर्ष आत मध्ये आहे मला काही फरक पडत नाही. तुमची एक तक्रार जर मी कोर्टात केली तर तुमची नोकरी घालवुन टाकीन. आपण कोणालाही घाबरत नाही, तुला काय करायचे ते कर’ अशी धमकी या आरोपीने पोलीस कर्मचारी शिरसाठ यांना दिली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब शिरसाठ यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी विशाल अशोक कोते याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 847/2023 भारतीय दंड संहिता कलम 353, 326, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव हे करत आहेे.

- Advertisment -

ताज्या बातम्या