मुंबई | Mumbai
काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) हे काँग्रेसमध्ये (Congress) येणार होते. त्यासाठी त्यांनी मंत्रिपदाची अटही घातली होती. नागपूरच्या (Nagpur) दोन नेत्यांमुळे आपण निवडून येणार नसल्याचं मुंडेंचं म्हणणं होतं, असा खळबळजनक गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
राज्यात आणि देशाच्या राजकारणात सध्या भाजपाचा (BJP) बोलबाला आहे. त्यामुळे भाजपात जाणार्यांची गर्दी गल्लीपासून दिल्लीपर्यंत (Delhi) पाहायला मिळते. तर, भाजपासोबत सत्तेत जाण्यासाठीही अनेक राजकीय पक्ष पुढाकार गेत असल्याचं दिसून येत आहे. त्यातच, आता माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा गौप्यस्फोट केला. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं, पण ऐनवेळी का रद्द झालं याची माहितीही त्यांनी दिली.
मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांच्यात गुप्त बैठका झाल्या होत्या. गोपीनाथ मुंडे यांनी मंत्री करण्याची अट घातली होती, मंत्रीपद द्या अन्यथा नागपूरचे दोघे मला निवडून येऊ देणार नाहीत, असेही गोपीनाथ मुंडेंनी त्यावेळी म्हटल्याचा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
सोनिया गांधी यांनी गोपीनाथ मुंडेंच्या पक्षप्रवेशाला परवानगी दिली, मात्र तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग (Former PM Manmohan Singh) विरोधी पक्षातला खासदार आपल्याकडे घेऊन मंत्री करणार नाही, अशी भूमिका घेतल्यानं त्यांचा प्रवेश झाला नाही, असा खुलासा देखील त्यांनी केला. या सर्व घडामोडीत मी पंतप्रधानांकडे न जाता थेट सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याकडे गेलो, याचा पश्चाताप होतो, असेही माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले.




