अखेर अमेरिकेला स्वातंत्र्य मिळाले. उत्साहित जनता आणि गोंधळलेले नेते अशा अवस्थेत स्वातंत्र्याची पहाट तर झाली होती; परंतु हे स्वातंत्र्य टिकवायचे आणि अखंड राष्ट्र निर्माण करण्याचे आव्हान मोठे होते. स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत एका ध्येयासाठी लढणा-या लोकांमधील अंतरविरोधांनी आता नखं बाहेर काढली होती. ब्रिटिशांची जुनी व्यवस्था संपुष्टात आली होती. मात्र नवीन व्यवस्थेची रूपरेषा निश्चित करणे आणि त्यानुसार तिची उभारणी करणे मोठे कठिण काम होते. हा संक्रमणाचा कालखंड अत्यंत नाजूक होता.
एक अखंड देश म्हणून १३ राज्यांची मोट बांधण्यासाठी संविधान निर्माण करणे अत्यंत आवश्यक होते. नवीन संविधान निर्माण होईपर्यंत आणि स्वीकारले जाईपर्यत देशांतर्गत शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान मोठे होते. भारताने हा अनुभव १५ ऑगस्ट १९४७ ते २६ जानेवारी १९५० पर्यंत घेतला आहे. अमेरिकेतील १३ वसाहती ज्यांना आता राज्य संबोधले जाऊ लागले होते. हया वसाहतींचे संस्थापक, इतिहास, भौगोलिक परिस्थिती, समृद्धी, विकास, जीवनशैली, जीवन मूल्यं अशा सर्व बाबतीत भिन्नता होती. तसेच एक अत्यंत महत्वाचा घटक त्यांच्या निर्मितीत पायाच दगड म्हणून रोवलेला होता, तो म्हणजे धर्म.
स्वातंत्र्याची अस्वस्थ पहाट
युरोपातील ख्रिश्चन धर्मातील विविध पंथाचे लोक आपल्या पंथासाठी स्वतंत्र भूमी मिळवण्यासाठी अमेरिकेच्या विविध भागात तिच्या शोधापासूनच आलेले होते. ज्या पंथाचे लोक अमेरिकेच्या ज्या वसाहतीत प्रथम वसेले त्या वसाहतीला ते आपली ‘प्रॉमिस लँड’ समजू लागले होते. त्यामुळे क्रांती पूर्व काळात १३ पैकी ९ वसाहतींमध्ये धर्म आणि राजकारण यांची मजबूत युती होती. हा एका अर्थाने युरोपातील धर्मकेंद्रित राजसत्तेचा हा एक काहिसा सुधारीत प्रकार म्हणता येईल. मेरीलँड, न्यूयॉर्क आणि दक्षिण अमेरिकेतील अन्य चार राज्यांमध्ये अँग्लिकन संप्रदाय हा राजधर्म होता, तर न्यू इंग्लंडच्या तीन वसाहतींमध्ये काँग्रीगेशनल संप्रदाय सर्वमान्य होता. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाच्या प्रारंभापासूनच राजकिय स्वातंत्र्यासोबतच धार्मिक स्वातंत्र्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यामुळे राजसत्ता आणि धर्मसत्ता यांच्या विलगीकरणाची मागणी मोठया प्रमाणात होऊ लागली.
न्यूयॉर्क, मेरीलँड, नॉर्थ -साऊथ कॅरोलिना आणि जॉर्जिया या वसाहतींमध्ये स्वातंत्र्ययुद्ध सुरू होताच राजकारणाने धर्मापासून फारकत घेतली; परंतु न्यू इंग्लंड आणि व्हर्जिनिया यांना यासाठी दीर्घकाळ प्रयत्न करावे लागले. व्हर्जिनियात धर्ममुक्त राजसत्ता आंदोलनाचे नेतृत्व थॉमस जेफरसन यांनी केले. १७८५ साली जेफरसन यांच्या प्रयत्नांना यश आले आणि व्हर्जिनियाचे राजकारण धर्ममुक्त झाले. सामन्यतः अमेरिकन क्रांतीने चर्चला प्रभावहीन करून टाकले होते. अमेरिकन स्वातंत्र्यामुळे धर्मकेंद्रित समाजव्यवस्था आणि राजसत्ता यांची स्वप्नं पाहणा-या लोकांचा एका अर्थाने भ्रमनिरास झाला होता. अमेरिकेत प्रभावी असलेले मेथोडिस्ट आणि अँग्लिकन या दोन प्रमुख ख्रिश्चन धर्म संप्रदायांची अवस्था, तर ‘न घर का न घाट का’ अशी झाली होती. हे दोन्ही संप्रदाय आपल्या मातृभूमीपासून कायमचे तुटले होते आणि आता नव्या अमेरिकेत त्यांना स्थान राहिले नव्हते. त्यांच्या अनुयायांची संख्या झपाटयाने घटली होती. प्रेसविटेरियन्स आणि बॅप्टिस्ट संप्रदायांची अवस्था अशीच झाली होती. एकूणच अमेरिकेतील सर्व ख्रिश्चन संप्रदाय प्रभावहीन झाले होते.
विजयापूर्वीचा हलकल्लोळ
अमेरिकेचा शोध ते निर्मिती यांचा इतिहास पाहिला तर प्रारंभी अमेरिकेच्या भूमीवर पोहचलेल्या साहसी खलाशांना या नव्या प्रदेशाचा शोध घ्यायाचा होता,व्यापा-यांना व्यापा-यासाठी माल व नव्या बाजारपेठांचा शोध घ्यायचा होता,शेतक-यांना शेतीयोग्य मुबलक जमिनीचा शोध घ्यायाचा होता. या सगळयांसोबत आलेल्या ख्रिश्चन धर्मातील विविध संप्रदायाचे धर्मगुरू व त्यांचे अनुयायी यांना नव्याने शोधण्यात आलेल्या आणि कोणत्याही धर्माचा स्पर्श न झालेल्या या भूमीवर विशुद्ध ख्रिश्चन धर्माचे राष्ट्र निर्माण करायाचे होते. खलाशी, व्यापारी व शेतकरी यांची मनोकामना केवळ पूर्णच झाली नाही, तर चिरंतन देखील झाली. अमेरिकन भूमीवरील धर्माचा प्रवास मात्र अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाने हा कायमचा खंडित केला. नव्या अमेरिकेत धर्म असणार होता; परंतु तो प्रत्येकाच्या मनात आणि घरात असणार होता. कारण धार्मिक उग्रता संपुष्टात आली होती. धर्माच्या नावावर जीव देण्यास कोणी तयार नव्हते आणि धर्माचा राजसत्तेचा संबंध मानण्यास कोणी तयार नव्हते.
अमेरिकन स्वातंत्र्याची पहाट आधुनिक युगाचा धर्म घेऊन आली होती. माणूस, त्याचे संपन्न भौतिक जीवन आणि सुखाच्या प्राप्तीसाठी समान संधी हा नव्या अमेरिकेचा नवा धर्म असणार होता. यामुळे कालांतराने सुखाच्या शोधात जगाच्या कानाकोप-यातून लोक अमेरिकेत जाणार होते आणि शांतीच्या शोधासाठी अमेरिकन जगाच्या कानाकोपरा धुंडाळणार होते. उपाशी माणूस कायम सुखाच्या शोधात असतो आणि पोटभरून अर्जिण झालेला माणूस शांतीच्या शोधात असतो. त्यामुळे सुख महत्वाचे की शांती या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न जगता अविरत सुरू आहे. तो वेगळया चर्चेचा विषय आहे. धर्ममुक्त नवा देश ही बाब आशादायक व उत्साहवर्धक होती; परंतु एक नवा देश उभा करण्यात अनेक बाधा अजूनही कायम होत्या. यातील सगळयात मोठी बाधा म्हणजे इंग्लंड आणि स्पेन यांच्यासोबत असलेले राजकिय संबंध.
व्हॅलीफोर्जचे अनोखे लसीकरण
अमेरिकेतील ब्रिटिश राजसत्तेशी निष्ठावंत असणा-या अमेरिकन लोकांच्या म्हणजेच टूरिंच्या जप्त करण्याता आलेल्या मालमत्ता त्यांना परत करण्यासाठी विविध राज्यांना शिफारस करण्याचे वचन अमेरिकन काँग्रेसने इंग्लंडला दिले होते. काही राज्यांनी हा आदेश मानला. मात्र तो मर्यादित प्रमाणातच मानला. अखेर १८०२ साली हा वाद संपुष्टात आला. त्याचबरोबर ६०,०००० पौंड घेतलेल्या कर्जाची परतफेड म्हणून इंग्लंडला दयावे लागले. अमेरिका -इंग्लंड यांच्यामधील तहानुसार इंग्लंड अमेरिकेतील आपल्या सर्व प्रशासकीय यंत्रणा आणि सेवा संपुष्टात आणणार होता; परंतु संपूर्णपणे इंग्लंडमुक्त अमेरिका होण्यासाठी बारा वर्षांचा कालावधी जावा लागला. स्वातंत्र्यानंतर बारा वर्षांपर्यंत कॅनडाच्या दक्षिण सीमेवर इंग्लंडच्या ७ सैनिकी चौक्या कायम होत्या. यासाठी इंग्लंडने संधीच्या अटींचा भंग अमेरिकेकडून करण्यात आला असे कारण दिले. त्यामध्ये दोन्ह मुख्य कलमांचा भंग विशेष होता. ते म्हणजे कर्जाची परतफेड आणि ब्रिटिश राजभक्तांना म्हणजे टूरींना देण्यात आलेली वागणूक. या वादावर तोडगा काढण्यासाठी १७८५ साली जॉन ॲडम्स यांना इंग्लंडला पाठवण्यात आले. ॲडम्स इंग्लंडमध्ये तीन वर्षे होते. त्यांनी अथक प्रयत्न केले तरी त्यांना हा वाद संपुष्टात आणण्यात यश आले नाही. अखेर निराश होऊन जॉन ॲडम्स अमेरिकेला परतले.
अमेरिकन संघाला मालाच्या निर्यात करण्याचा व व्यापार विनिमयाचा अधिकार नसल्यामुळे वाटाघाटीत ॲडम्स यांचा पक्ष दुबळा ठरला होता. इंग्लंडसोबत झालेल्या तहातील काही कलमांमुळे स्पेन दुखावला गेला होता. तहात पश्चिम प‹लोरिडातील काही भाग हा स्पेनचा असेल हे इंग्लंडने मान्य केले होते. मात्र स्वातंत्र्य युद्धाच्या कालखंडात स्पेनने संपूर्ण पश्चिम प‹लोरिडा आपल्या अधिपत्याखाली घेतला होता. त्यामुळे इंग्लंडने देऊ केलेला कमी भूभाग घेण्यास आणि आपण ताब्यात घेतलेला मोठा भूभाग देण्यास स्पेनने नकार दिला. त्याचबरोबर त्याने पश्चिम जॉर्जिया आणि कंबरलँड नदीच्या दक्षिणेकडील भूभागाची अतिरिक्त मागणी केली होती. आपल्या भूभागावरून इंग्लंड व स्पेन यांच्यात चाललेली रस्सीखेच पाहून अमेरिका अस्वस्थ झाला होता. हया विवादग्रस्त भागात मोठया संख्येने आदिवासी जमाती होत्या. पूर्वीपासून स्पेनच्या वसाहती तेथे असल्यामुळे स्पेन तेथील आदिवासींना अमेरिकेच्या विरोधात भडकावत होता. तसेच अमेरिकेसोबत असलेले सर्व व्यापारी संबंध तोडण्यासाठी चिथावत होता.
क्रांतीसेनेचा बौद्धिक सरसेनापती
मिसिसिपी नदीच्या दोन्ही तटांवर आणि याजो नदीच्या भूमुखाच्या परिसरात स्पेनचे र्निविवाद वर्चस्व होतेच, त्यामुळे भूमी आणि जल अशा दोन्ही स्तरांवर अमेरिका – स्पेन असा संघर्ष उभा राहिला. मिसिसिपी नदीच्या दोन्ही तटांवरील दोनशे किलोमिटरचा भाग आपल्या देण्यात यावा असा दावा देखील स्पेनने केला. दुस-या बाजूला मिसिसिपी नदीवर जलवाहतुकीचे स्वातंत्र्य अमेरिकेला हवे होते. १७८५ साली यासंदर्भात एक संधीवार्ता उभय देशांमध्ये झाली. व्यापारी करारांच्या पलिकडे भूमी आणि जल संबंधित विवावदास्पद मुद्दयांवर कोणताही तोडगा यामध्ये निघाला नाही. अमेरिकेला हे सर्व हाताळतांना अधिक कठिण होत होते. याची प्रमुख दोन कारणे होती एक म्हणजे एकसंघ किंवा संघराज्य म्हणून अमेरिकेत अद्याप एकसंधता निर्माण झालेली नव्हती आणि दुसरे म्हणजे संघराज्य म्हणून अमेरिकेच्या संविधानाची निर्मिती व स्वीकृती झालेली नव्हती. त्यामुळे लवकरात लवकर संविधान तयार करणे आणि संघराज्य म्हणून संयुक्त राज्य अमेरिकाची घोषणा होणे महत्वाचे होते. संविधानाची असलेली प्राथमिकता अमेरिकन नेत्यांच्या लक्षात आली होती. त्यांनी त्या दिशेने पाऊले उचलण्यास प्रारंभ केला होता. मात्र त्या संविधानावर कोणत्याही धर्माचा पगडा असणार नाही. हे निश्चित झाले होते. भविष्यात धर्मनिरपेक्ष संविधान हाच अमेरिकेचा धर्म ठरणार होता.
प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६
(लेखक धर्म,इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक आहेत)