Monday, May 6, 2024
Homeनगर‘ती’ मूर्ती देवदेवतांची नव्हे तर वीरगळाची - प्रा. डॉ. लांडगे

‘ती’ मूर्ती देवदेवतांची नव्हे तर वीरगळाची – प्रा. डॉ. लांडगे

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

टाकळीभान येथे 15 ऑगस्ट रोजी राजवाडा परीसरात आडगळीतील विहिरीजवळ ग्रामस्थांना आढळून आलेल्या पुरातन दगडी शिळेबाबत उलट सुलट चर्चा होत असल्याने इतिहास संशोधक प्रा. डॉ. शिरीष लांडगे यांनी टाकळीभान येथे भेट देऊन दगडी शिळेवरील मूर्तीची पहाणी केली. या प्रकारच्या पुरातन मूर्तींचे दाखले देऊन ही मूर्ती देव देवतांची नसून ते विरगळु शिल्प असल्याचे सांगितले.

- Advertisement -

टाकळीभान येथील राजवाडा परिसरात आडगळीत पडलेल्या पाण्याच्या विहिरीजवळ देवाची मूर्ती असल्याचा एका भाविकाला स्वप्नात साक्षात्कार झाला. सकाळी त्यांनी हा प्रकार काही नागरिकांना सांगितल्याने काहींनी जाऊन पाहिले असता सुमारे पाच फुटाची कोरलेली शिळा आढळून आली. त्यामुळे देवाची मूर्ती सापडल्याची चर्चा पसरल्याने नागरिक अवाक झाले. काही सुज्ञ नागरीकांना ही देवाची मूर्ती नाही, असा ठाम विश्वास होता. याबाबतची खात्री करण्यासाठी इतिहास संशोधक सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणेच्या अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रा. डॉ. शिरीष लांडगे यांनी प्रत्यक्ष मूर्ती स्थळाला भेट देऊन पहाणी केली.

यावेळी डॉ. लांडगे म्हणाले, ही कोणत्याही देव देवताची मूर्ती नाही तर विरगळाची शिळा आहे. ही शिळा साधारणपणे 10 व्या शतकातील असावी. त्याकाळी साधने नसल्यामुळे दगडी शिळेवर सांकेतिक चिन्हांच्या स्वरुपात दगडी शिळा कोरल्या जात होत्या. युध्दात विरमरण आलेल्या योध्द्याची दगडाच्या शिळेवर मूर्ती कोरली जाऊन त्याच्या किर्तीची आठवण ठेवली जात होती. या मूर्तीच्या एका हातात ढाल तर दुसर्‍या हातात तलवार असायची. मूर्तीच्या डोक्याच्या वरच्या बाजुला चंद्र आणि सूर्य कोरलेला असायचा. याचा अर्थ असा घेतला जायचा की चंद्र सुर्य असेपर्यंत तुमची किर्ती दरवळत राहो. त्या मुर्तींना विरगळ असे संबोधले जात होते.

येथे आढळलेली मूर्तीही त्या प्रकारातील असल्याने ती विरगळच आहे. कोणत्याही देवी देवताशी या मूर्तीचा संबंध येत नाही. त्यामुळे याबाबत अंधश्रध्दा पसरवू नये. पुरातन शिल्प असल्याने अशा पुरातन शिल्पाचा ग्रामस्थांनी संग्रह करणे गरजेचे असून पुढच्या पिढ्यांनाही याबाबत माहिती मिळेल. कदाचित मूर्ती सापडलेली जागा ही युध्दभुमी असल्याचीही शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केली.

याप्रसंगी ग्रामिण कवी पोपटराव पटारे, दत्तात्रय महाराज बहीरट, राजेंद्र देवळालकर उपस्थित होते. डॉ. लांडगे यांनी दिलेल्या माहितीने गावात सुरु असलेल्या उलट सुलट चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या