अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
धीरज परदेशी यांच्या हत्येनंतर सोमवारी (10 ऑगस्ट) अहिल्यानगर शहर बंद ठेवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर दुकान बंद करण्यास सांगत बेकरी व्यावसायिक दोन भावांना शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण केल्याची घटना शहरातील बुरूडगाव रोडवरील पॉलिटेक्निक कॉलेजसमोर असलेल्या वर्धमान बेकर्स येथे घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तीन अज्ञात इसमांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सार्थक माणिक गांधी (वय 21, रा. सारसनगर) यांनी फिर्याद दिली आहे. सार्थक गांधी व त्यांचा भाऊ साहिल हे दोघे वर्धमान बेकर्स येथे भागीदारीत व्यवसाय करतात. फिर्यादीनुसार, सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सार्थक हे दुकानाचे अर्धे शटर खाली घेऊन साफसफाई करीत होते. त्यावेळी त्यांचा भाऊ साहिल दुकानाबाहेर उभा होता. त्याचवेळी दुचाकीवरून तीन अनोळखी इसम दुकानाजवळ आले. त्यांनी साहिलला दुकान आताच्या आत्ता बंद करायचे असे सांगत शिवीगाळ व दमदाटी केली. या तिघांची आरडाओरड ऐकून सार्थक दुकानाबाहेर आले. त्यानंतर तिन्ही इसमांनी कोणतेही कारण नसताना सार्थक व साहिल या दोघांना दमदाटी करून मारहाण केली.
यातील एकाने हातातील लोखंडी कड्याने सार्थक यांच्या तोंडावर वार करून जखमी केले. तसेच संशयित आरोपींनी साहिललाही मारहाण केली. दरम्यान, हल्लेखोरांनी दगड फेकूनही मारहाण केली. मारहाणीनंतर तिन्ही अनोळखी इसम दुचाकीवरून तेथून पसार झाले. घटनेनंतर सार्थक व साहिल हे दोघे कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि त्यांनी तिघांविरूध्द फिर्याद दिली. दुकान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य उपलब्ध माहितीच्या आधारे संशयित आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.




