अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून, श्रीगोंदा येथील एकाने अहिल्यानगरमधील तिघा व्यावसायिकांना तब्बल 70 लाख रूपयांना गंडवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पैसे घेतल्यानंतर रक्कम नसलेले चेक देऊन विश्वासघात केला.
याप्रकरणी समीर शब्बीर सय्यद (रा. मुंजोबा चौक, श्रीगोंदा) याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात मंगळवारी (28 ऑक्टोबर) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमान बशीर शेख (वय 49, रा. हाजी इब्राहिम कॉलनी, अहिल्यानगर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी इमान शेख, त्यांचा भाऊ अखलाख शेख आणि मित्र जहीर शेख हे तिघेही महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टर आहेत. 2023 मध्ये समीर सय्यद याने फिर्यादीसह तिघांची भेट घेतली. ‘मी शेअर मार्केटमध्ये मोठी कमाई केली आहे, तुम्हीही पैसे गुंतवा, तुम्हाला भरपूर नफा मिळवून देतो’, असे आमिष दाखवून त्याने तिघांचा विश्वास संपादन केला. सय्यदच्या बोलण्यावर विश्वास ठेवून, तिघांनी मिळून 5 महिन्यांसाठी 70 लाख रूपये गुंतवण्यास तयारी दर्शवली.
24 जून 2024 रोजी जुने जिल्हाधिकारी कार्यालय आवारात 100 रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर रीतसर नोटरी करून, तिघांनी समीर सय्यदला 70 लाख रूपये रोख दिले. यामध्ये इमान शेख व अखलाख शेख यांचे प्रत्येकी 15 लाख, तर जहीर शेख यांचे 40 लाख रूपये होते. या व्यवहारापोटी सय्यदने फिर्यादी व जहीर शेख यांना अनुक्रमे 30 लाख व 40 लाखांचे दोन धनादेश (चेक) दिले होते.
मुदत संपल्यानंतर 17 डिसेंबर 2024 रोजी हे चेक बँकेत जमा केले असता, खात्यात पैसे नसल्याने ते बाऊन्स झाले. फिर्यादींनी सय्यदला फोन केला असता, त्याचा फोन बंद लागला. त्यांनी श्रीगोंदा येथे जाऊन चौकशी केली असता, समीर सय्यद हा अशाच फसवणुकीच्या गुन्ह्यात आधीच जेलमध्ये असल्याची माहिती समोर आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलीस अधीक्षक यांच्याकडे अर्ज केला. अर्ज चौकशीनंतर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




