Sunday, September 15, 2024
Homeनगरसार्वजनिक बांधकाम व अकोले नगरपंचायतच्या ढिसाळ कारभाराने घेतला तरुणाचा बळी

सार्वजनिक बांधकाम व अकोले नगरपंचायतच्या ढिसाळ कारभाराने घेतला तरुणाचा बळी

अकोले |प्रतिनिधी| Akole

- Advertisement -

सार्वजनिक बांधकाम विभाग व अकोले नगरपंचायतच्या ढिसाळ कारभाराने तालुक्यातील मूळ वीरगाव येथील पण हल्ली संगमनेर येथे राहणार्‍या हेमंत भानुदास अस्वले (वय 40) या तरुणाचा अपघातात रात्री बळी घेतला आहे. तर त्याची पत्नी राणी अस्वले ( वय 32)ही गंभीर जखमी झाली आहे. दरम्यान शहरातील सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ नाईकवाडी व अन्य कार्यकर्त्यांनी या घटनेबद्दल सार्वजनिक बांधकाम विभाग व अकोले नगरपंचायतच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.

हेमंत भानुदास अस्वले व त्याची पत्नी राणी अस्वले हे सोमवारी तालुक्यात हरिश्चंद्र गड परिसरात पर्यटन करून घरी परतत असताना अकोले येथील कराळे किराणा दुकानासमोर सोमवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या दरम्यान रस्त्याच्या अर्धवट कामामुळे खटकीवरून मोटारसायकल कोल्हार-घोटी रस्त्यावर पडल्याने पाठीमागून येणार्‍या सिमेंट काँक्रीट मिक्सरच्या गाडीने त्यांना चिरडले. यात दोघेही पती पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांना येथील डॉ. भांडकोळी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्यांची परिस्थिती चिंताजनक असल्याने तातडीने संगमनेर येथील एका खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान हेमंत अस्वले या तरुणाचा रात्री मृत्यू झाला. त्याच्यावर वीरगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार आले.

या घटनेचे तीव्र पडसाद अकोले शहरात उमटले.सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ नाईकवाडी, सचिन शेटे, राहुल शेटे व अन्य कार्यकर्ते व स्थानिक व्यापारी, नागरिक यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व अकोले नगरपंचायतच्या गलथान कारभाराने हेमंत अस्वले याचा बळी घेतला असल्याचा आरोप करत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान अकोले नगरपंचायतने शहरातून जाणार्‍या कोल्हार-घोटी रस्त्याच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी पत्रव्यवहार केला मात्र ठेकेदाराने शहरातील गटारीच्या व अन्य छोट्या कामांसाठी स्थानिक उपठेकेदार नियुक्त केला आहे.

पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला असणारी मातीमिश्रित गाळामुळे अनेक दुचाकी वाहनांचे रस्त्यावर घसरून अपघात झाले आहे. गटारीवर मोठी वाहने जाऊन अनेकवेळा अपघातही झाले आहेत. मागील महिन्यात माजी आमदार वैभव पिचड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता वर्पे, उपअभियंता महेंद्र वाकचौरे, शाखा अभियंता पाचोरकर यांच्यासह नगरपंचायत पदाधिकारी, नगरसेवक यांनी अपूर्ण कामांची पाहणी केली होती व त्यावेळी श्री. वर्पे यांनी संबधीत ठेकेदाराची माणसे व उप ठेकेदार यांना अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या मात्र तरीही हे काम अद्यापही पूर्ण झाले नसल्याबद्दल नगरपंचायत पदाधिकारी, नगरसेवक, स्थानिक ग्रामस्थ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी संबंधित विभागांनी आप आपली कामे पूर्ण करण्याचा निर्णय पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग व अकोले नगरपंचायत मात्र सुस्त असल्याचे चित्र दिसत आहे.

ही फारच दुर्दैवी-अक्षम्य घटना आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे संबंधित गेंड्याच्या कातडीचे अधिकारी, ठेकेदार यास पूर्णतः दोषी आहेत. कित्येक वेळा यांच्या ढिसाळ कारभाराविषयी माध्यमांतून आवाज उठवला तरी यांना पर्वा नाही. तीच बाब नगरपंचायतीची आहे. गटारी, रस्ते, सांडपाणी व्यवस्था या सार्‍या प्रकारांबाबत अंतर्गत रस्ते आणि प्रमुख वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून यांच्यावरच रितसर गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे.

– डॉ. सुनील शिंदे, अकोले

- Advertisment -

ताज्या बातम्या