Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात करोनाचा हाहाकार

पुण्यात करोनाचा हाहाकार

पुणे |प्रतिनिधि| Pune

पुण्यात सध्या करोनाने हाहाकार माजवला असून रुग्णसंख्येच्या वाढीमुळे पुण्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालल्याचं दिसून येत आहे.

- Advertisement -

पुण्यात सध्या सुमारे 52 हजारांच्या आसपास सक्रिय रुग्णसंख्या असून आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले आहेत. रुग्णांना बेड मिळत नाही आणि मिळालाच तर उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन नाही त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची फरफट होत आहे. बेडशिवाय आणि रेमडेसिवीर इंजेक्शनशिवाय रुग्णांना प्राण गमवावे लागत आहे. विशेष म्हणजे पुण्यात एकही व्हेंटिलेटर बेड किंवा आयसीयू बेड रुग्णासाठी उपलब्ध नसल्याचं विदारक चित्र समोर आलं आहे. त्यामुळे सध्या पुण्याच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असल्याचं पाहायला मिळत आहे.

पुण्यातील ही भीषण परिस्थिती पाहून आरोग्य यंत्रणेची निव्वळ लक्तरं निघाल्याचं भयान चित्र समोर येत आहे. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड मिळत नाहीत, चाचण्यांचे अहवाल वेळेवर येत नाहीत, औषधे मिळत नाहीत. अशा स्थितीत आत्तापर्यंत 4 जणांचे बेड मिळाला नाही म्हणून मृत्यू झालेत, तर रेमडिसिव्हरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची फरफट थांबायचं नाव घेत नाही.

रेमडिसीव्हर मिळत नसल्याने त्याचा काळाबाजार थांबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे औषध रुग्णाला थेट हॉस्पिटलमध्येच उपलब्ध होईल असे आदेश काढले. मात्र, हे आदेश कागदावरच आहेत. हॉस्पिटलमध्ये इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक मेडिकल बाहेर गर्दी करतायेत. अशा गर्दी होणाऱ्या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्त लावून गर्दी हटवली जातीये.

दरम्यान, शहरातील रेमडिसीव्हर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी अजून किमान 5 दिवस लागणार आहेत. सोमवारी रात्रीपर्यंत 5 हजार रेमडिसीव्हर पुण्यात येतील, त्यानंतर कोविड हॉस्पिटलमध्ये त्याचा पुरवठा केला जाईल, अशी माहिती अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त व्ही. एस. प्रतापवार यांनी दिलीये. राज्यात रेमडिसीव्हर निर्मिती करणारी एकच कंपनी आहे. त्यात रेमडिसीव्हर इंजेक्शनची एक बॅच तयार करण्यासाठी 20 दिवसांचा कालावधी लागतो. एका बॅचमध्ये 30 ते 35 हजार रेमडिसीव्हर इंजेक्शन तयार होतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या