पुणे । Pune
राजकीय वाटाघाटी, रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या मुलाखतींच्या फेऱ्या आणि अनपेक्षित धक्कातंत्राचा वापर करत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर पुणे विधान परिषद निवडणुकीसाठी आपला पत्ता ओपन केला आहे. अनेक अनुभवी नेत्यांना आणि माजी आमदारांना मागे टाकत, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विक्रम काकडे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालण्यात आली आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या घोषणेमुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
विधान परिषदेच्या जागावाटपाच्या वाटाघाटीत पुण्याची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आली होती. ही जागा सुटल्याचे स्पष्ट होताच उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली. शनिवारी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘जिजाई’ या निवासस्थानी उमेदवारीसाठी इच्छुकांच्या मॅरेथॉन मुलाखती पार पडल्या. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी मध्यरात्रीपर्यंत अनेक दिग्गज इच्छुकांसोबत सविस्तर चर्चा केली.
या शर्यतीत वडगाव शेरीचे माजी आमदार सुनील टिंगरे, माजी उपमहापौर दीपक मानकर आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांसारखे अनुभवी चेहरे आघाडीवर होते. मात्र, राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत तरुण चेहरा असलेल्या विक्रम काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. विक्रम काकडे हे भाजपचे माजी राज्यसभा खासदार आणि प्रसिद्ध उद्योगपती संजय काकडे यांचे चिरंजीव आहेत. ते पुण्यात ‘काकडे ग्रुप’ अंतर्गत बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात कार्यरत आहेत.
अनुभवी राजकारण्यांना बाजूला सारून विक्रम काकडेंना संधी मिळण्यामागे खासदार पार्थ पवार यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरल्याचे समजते. विक्रम काकडे हे खासदार पार्थ पवार यांचे बालपणीचे मित्र आणि अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. विक्रम काकडे हेच पार्थ पवार यांची पहिली पसंती होते आणि त्यांच्या उमेदवारीसाठी पार्थ यांनी आग्रही भूमिका घेतली होती. त्यामुळे कोअर कमिटीने काकडेंना दिलेली उमेदवारी म्हणजे पार्थ पवारांच्या शब्दावर मारलेले शिक्कामोर्तब असल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे, रायगड-रत्नागिरी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. उमेदवारी निश्चित होताच तटकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. महायुतीच्या जागावाटपाच्या सूत्रानुसार, ही जागा राष्ट्रवादीला सोडण्याच्या बदल्यात रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेनेकडे (शिंदे गट) जाणार आहे. त्यामुळे शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री भरत गोगावले हे रायगडचे नवे पालकमंत्री होणार हे आता स्पष्ट झाले आहे. अनुभवी नेत्यांऐवजी एका तरुण उद्योगपतीला आणि मित्राला दिलेली ही संधी प्रत्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीसाठी किती फायदेशीर ठरते, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.




