पुणे । प्रतिनिधी
शनिवारी २४ ऑगस्ट रोजी सर्व विरोधी पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र, न्यायालयाने बंद पुकारता येणार नाही, असं स्पष्ट करत बंद मागे घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर विरोधी पक्षांनी बंद मागे घेत असल्याचं जाहीर केलं.
तसेच, या काळात महाराष्ट्रभर विविध ठिकाणी दिवसभर आंदोलनं केली जातील, असंही स्पष्ट केलं. गेल्या काही काळात उघड झालेल्या बलात्काराच्या घटनांच्या निषेधार्थ ही आंदोलनं केली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात भरपावसात आंदोलन केलं. यावेळी महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.
बदलापूरमधील अत्याचाराच्या घटनेवरुन महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन केले. पुणे स्टेशनसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर तोंडाला काळा मास्क, हाताला काळ्या फिती बांधून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांचा निषेध व्यक्त केला.
हे हि वाचा : ‘विकृती विरुद्ध संस्कृती यासाठी बंद’…; उध्दव ठाकरेंनी सांगितला कसा असे बंद
शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर, रमेश बागवे, मोहन जोशी, संगिता तिवारी, वंदना चव्हाण, आबा बागुल यांच्यासह अन्य काही नेते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. आंदोलनादरम्यान, पावसानेही जोरदार हजेरी लावली. यावेळी शरद पवार यांनी सर्वांसमोर प्रतिज्ञा वाचून घटनेचा निषेध केला.
दरम्यान या वेळी सुप्रिया सुळेंनी आपली भूमिका मांडताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर परखड शब्दांत हल्लाबोल केला. संविधानात प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आहेत. न्याय प्रत्येकासाठी समान असायला हवा. बदलापूर, सातारा, कोल्हापूर, दौंड अशा अनेक घटना गेल्या १५ दिवसांत वाढलेल्या आपण बघतोय. प्रशासनाकडून अपेक्षित असं सहकार्य सगळीकडे दिसत नाहीये. अनेक घटना पुन्हा पुन्हा झाल्या आहेत. त्याची नोंद पोलिसांनी घेतली नाही म्हणून ही कृत्य वाढली आहेत. वर्दीची भीती राहिलेलीच नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हे हि वाचा : शरद पवारांना केंद्राच्या झेड प्लस सुरक्षेवर शंका; म्हणाले…
सरकार किती असंवेदनशील आहे बघा. बदलापूरला आंदोलन झालं. सत्तेतल्या लोकांनी असं भाष्य केलं की बदलापूरला आलेले लोक बाहेरचे होते. ते कुठलेही असोत, ते भारतीय होते आणि भारताच्या लेकीसाठी लढत होते. याची नोंद या सरकारनं घेतली पाहिजे. शेवटी सत्य बाहेर आलंच. तिथलं कुणीही बाहेरचं नव्हतं. ती बदलापूरची सामान्य जनता होती जी त्यांच्या लेकीसाठी लढत होती. यातून सरकारची विचारसरणी काय आहे हे उघड झालं आहे, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले पुण्यात बलात्कार झालेल्या प्रकरणात दोन महिन्यांत आपण त्या नराधमाला फाशी दिली. असं झालं असेल तर आपण सगळे जाहीरपणे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करायला जाऊ. प्रत्येक गोष्टीत गलिच्छ राजकारण आणायचं. इतकं असंवेदनशील सरकार मी आजपर्यंत पाहिलं नाही, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं.