पुणे | Pune
येथील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार शीतल तेजवानीला (Sheetal Tejwani) पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक (Arrested) केली आहे. पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरातील ४० एकर जमिनीच्या गैरव्यवहारप्रकरणात शीतल तेजवानीने मोठी भूमिका बजावली होती. त्यानंतर तिने जमीन ताब्यात घेण्यासाठी पॉवर ऑफ अटर्नीचे हत्यार उपसले होते. मात्र, अखेर तिला बेड्या ठोकण्यात आल्या.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील (Mundhwa Land Scam Case) तपासाचा वेग वाढवल्यानंतर पोलिसांनी शीतल तेजवानीची याआधी दोन वेळा चौकशी केली होती. चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून तिचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याचे समोर आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार, दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांनी संगनमत करून मुंढव्यातील ४० एकर जमीन बळकावल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यानंतर आता शीतल तेजवानी हिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी विकास खारगे आणि राजेंद्र मुठे यांची एक समिती गठीत करण्यात आली होती. तसेच तेजवानी आणि अमेडिया कंपनीच्या (Amedia Company) संचालकांनी नेमकी काय आणि कशी बनवाबनवी केली आहे. त्यानुसार पोलीस तपास करीत होते. अखेर या प्रकरणाचा गंधही नसल्याचे दाखवणाऱ्या आणि सरकारी यंत्रणांना कामाला लावलेल्या व्यवहारातील मास्टरमाइंड शीतल तेजवानीला पोलिसांनी अटक केली आहे.




