पुणे | Pune
राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून सर्वत्र नाकाबंदी आणि तपासण्या सुरू झाल्या आहेत. निवडणुकीमध्ये पैसे आणि गैरव्यवहार होऊ नये यासाठी मोठे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. अशातच आज पुण्यात सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचे सोने पकडले गेले आहे. आज सकाळी केलेल्या कारवाईत एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने जप्त करण्यात आले आहे.
पुण्यातील सहकार नगर येथे पोलिसांनी एमएच ०२ ईआर ८११२ या कंटेनरला तपासणीसाठी थांबवले असता पांढऱ्या रंगाच्या कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात सोने असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. या कंटेनरमधील सोन्याची एकूण किंमत १३८ कोटी रुपये इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. नियमित नाकाबंदीदरम्यान सदर सोन्याचा कंटेनर थांबवून तपासणी करण्यात आली. सहकारनगर परिसरातून ताब्यात घेतलेला हा टेम्पो एका खासगी लॉजिस्टिक कंपनीचा असून यामधील सोने पुण्यातील कुठल्या व्यापाऱ्याकडे जात होते, याचा तपास सध्या सुरू असून पोलिसांनी या संदर्भात सगळी माहिती आयकर विभाग तसेच निवडणूक आयोगाला कळवलेली आहे.
सध्या दिवाळीची धामधुम सुरू आहे. या सणावेळी सोन्याला मोठी मागणी असते. त्यावेळी लॉजिस्टिक म्हणजेच गोडाऊनवरून सोने व्यापाऱ्यांकडे नेले जाते त्यामुळे हा टेम्पो व्यापाऱ्याचा आहे का? कोठून हा टेम्पो निघाला होता आणि कुठे जात होता याचा तपास केला जात आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्यात अनेक ठिकाणी कोट्यावधी रूपये सापडत आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये गैरव्यवहार होऊ नयेत, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. शहर परिसरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. गाड्यांची तपासणी केली जात आहे, त्या तपासणीमध्ये हे सोने आढळून आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास तपासणीवेळी हा टेम्पो अडवला. त्यामध्ये पांढऱ्या पोत्यात बॉक्स आढळले, त्यानंतर चालक आणि आणखी एक जण यामध्ये होता, त्यांच्याकडे चौकशी केली, त्याची तपासणी अद्याप चालू आहे. हे जवळपास १३८ कोटी रूपयांचं सोनं असल्याची माहिती समोर आली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा