Wednesday, September 9, 2026
Homeमहाराष्ट्रAccident News : राज्यात खड्ड्याचा आणखी एक बळी, वडिलांसमोरच 11 वर्षीय मुलाचा...

Accident News : राज्यात खड्ड्याचा आणखी एक बळी, वडिलांसमोरच 11 वर्षीय मुलाचा मृत्यू

पुणे । Pune

एकीकडे रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे होणारे अपघात याविरोधात राज्यभरातून संतापाची लाट उसळत असतानाच, पुण्यातून अत्यंत सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. प्रशासनाचा नाकर्तेपणा आणि खड्ड्यांच्या साखळीने आणखी एका निष्पाप चिमुकल्याचा बळी घेतला आहे. बालेवाडी परिसरातील महाळुंगे येथील रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकी घसरून ११ वर्षांच्या मुलाचा स्वतःच्या वडिलांच्या डोळ्यांदेखत आयशर ट्रकखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला.

- Advertisement -

सोमवारी (१७ ऑगस्ट) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ११ वर्षांचा मुलगा आपल्या वडील आणि बहिणीसोबत दुचाकीवरून ट्यूशनला जात होता. महाळुंगे येथील ग्रीन कोट सोसायटीसमोरील दुर्गा कॅफेजवळ दुचाकी आली असता, रस्त्यात असलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी घसरली. दुचाकीवर बसलेले तिघेही अचानक रस्त्यावर फेकले गेले. दुर्दैवाने, त्याच क्षणी मागून येणाऱ्या भरधाव आयशर ट्रकच्या मागील चाकाखाली हा चिमुकला आला आणि ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने त्याचा जागीच प्राण गेला.

वडील आणि बहिणीच्या समोर घडला काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग

आपल्या डोळ्यांदेखत पोटच्या गोळ्याचा झालेला हा करुण अंत पाहून वडिलांनी आणि बहिणीने मारलेला टाहो उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. ही संपूर्ण थरारक दुर्घटना परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, याचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत आयशर ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.

विशेष म्हणजे, ज्या दिवशी ही दुर्दैवी दुर्घटना घडली, त्याच दिवशी नाशिकमध्ये रस्ते आणि खड्ड्यांविरोधात शिवसेना (ठाकरे गट) कडून तीव्र मोर्चा काढण्यात आला होता. एवढेच नव्हे तर युवानेते आदित्य ठाकरे यांनी दुपारीच पुणे जिल्ह्यातील चाकण एमआयडीसी परिसरातील खड्ड्यांची आणि रस्त्यांच्या चाळणीची पाहणी केली होती. या राजकीय घडामोडींनंतर काही तासांतच शहरात खड्ड्याने चिमुकल्याचा बळी घेतल्याने नागरिक आणि स्थानिक रहिवाशांमधून प्रशासनाविरोधात प्रचंड तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे आणि भिवंडी यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये रस्त्यांची झालेली दुरावस्था आता जीवघेणी ठरू लागली आहे. “प्रशासनाने वेळीच हे खड्डे बुजवले असते, तर या निष्पाप बालकाचा जीव वाचला असता,” असा थेट आरोप स्थानिकांनी केला आहे. या दुर्घटनेनंतर तरी रस्ते देखभाल यंत्रणा जागी होणार का आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होणार का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

ताज्या बातम्या

MPSC च्या अभ्यासाचा ताण अन् अडीच लाखांचे कर्ज; पुण्यात धाराशिवच्या विद्यार्थ्याची...

0
पुणे । Pune स्पर्धा परीक्षेचे 'माहेरघर' मानल्या जाणाऱ्या पुण्यातून एक अत्यंत वेदनादायी आणि मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. राज्यभरात एकीकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या...