जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed
शहरातील आरोळेनगर येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेच्या वसतिगृहातील रॅगिंगप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा कांबळे व प्रभारी अधिक्षक खंडू होगले यांना निलंबित करण्यात आले आहे. पुणे विभागाचे समाजकल्याण आयुक्त ओम बकोरीया यांनी तसे आदेश काढले आहेत.
दरम्यान, शाळेचे शिक्षक सुभाष शितोळे यांची मुख्याध्यापकपदी तर अधिक्षक म्हणून मधुकर महानुर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, वसतिगृहात दि. 20 एप्रिलला सायंकाळी 8 वाजता तसेच दि. 21 रोजी दुपारी दुपारी 1.45 वाजता 9 वीच्या विद्यार्थ्यांकडून 8 वीच्या विद्यार्थ्यांना हाताने व बेल्टच्या सहाय्याने बेदम मारहाण करण्यात आली. या रॅगिंगबाबतचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. घटना घडून तीन दिवस झाल्यानंतरही या शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा कांबळे व प्रभारी अधिक्षक खंडू होगले यांनी घटनेबाबत वरिष्ठ कार्यालयास कोणतीही लेखी माहिती अथवा तोंडी कल्पना दिली नाही. प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा व बेजबाबदारपणाबद्दल मुख्याध्यापिका कांबळे व प्रभारी अधिक्षक होगले यांचे निलंबन करण्यात आले.
दरम्यान, वसतिगृहातील मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर संबंधित घटनेची दखल घेत जिल्हास्तरीय चार अधिकार्यांची समिती स्थापन करण्यात आली. या समितीमार्फत चौकशी करण्यात आली. समाज कल्याण विभागाचे सहायक उपायुक्त कोरंगटिवार यांनीही वसतिगृहाला भेट दिली होती. अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आला.
रॅगिंग करत मारहाण करणार्या तीन विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले आहे. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती नेमण्यात आली आहे. याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अतिश पारवे यांनी निवेदन देत जबाबदार कर्मचारी अशा प्रकरणांकडे गांभिर्याने पाहत नाहीत. त्यामुळे त्यांची चौकशी होवून ते निलंबित व्हावेत, अशी मागणी केली होती.