Wednesday, February 4, 2026
Homeनगरराहाता नगरपरिषद निवडणूक : दिवाळीतील 'फराळ-राजकारण' आणि भावी उमेदवारांची दमछाक!

राहाता नगरपरिषद निवडणूक : दिवाळीतील ‘फराळ-राजकारण’ आणि भावी उमेदवारांची दमछाक!

राहाता ( बाळासाहेब सोनवणे)

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्याने संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले असताना, राहाता नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या भावी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दीपावली सणाचा मुहूर्त साधला आहे.

- Advertisement -

नोव्हेंबरमध्ये नगरपरिषद निवडणुका होणार असल्याने, उमेदवारीसाठी उत्सुक असलेल्या इच्छुकांनी मतदारांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात दिवाळीतील फराळ वाटप, किराणा साहित्य वाटप आणि सदिच्छा भेटसत्रांवर भर दिल्याचे चित्र सध्या राहात्यात दिसत आहे. मात्र, मतदारांना गाठण्याच्या या धावपळीत अनेक भावी नेत्यांची अक्षरशः दमछाक झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

YouTube video player

राज्य सरकारने नगरपरिषद (नोव्हेंबर), पंचायत समिती व जिल्हा परिषद (डिसेंबर) आणि महानगरपालिका (जानेवारी) निवडणुका घेण्याच्या दृष्टीने युद्ध पातळीवर तयारी सुरू केली आहे. राहाता नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद व प्रभाग आरक्षण सोडत तसेच मतदार यादीचे काम अंतिम टप्प्यात आल्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या हालचाली वाढल्या आहेत.

भावी नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवारांनी दिवाळीच्या निमित्ताने मतदारांना किराणा साहित्य, दीपावलीचा फराळ आणि मिठाई वाटप करून त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे. हा एकप्रकारे मतदारांना खुश ठेवण्याचा आणि आपली उमेदवारी त्यांच्या स्मरणात ठेवण्याचा ‘दिवाळी पॅकेज’ मार्ग ठरला आहे. इच्छुकांनी रोज सकाळी मतदारांच्या घरी, पारावर, गावातील चौकात आणि चहाच्या कट्ट्यांवर जाऊन गप्पा मारणे, आपली निवडणुकीकरिता पात्रता पटवून देणे आणि राजकीय ‘व्ह्यू रचना’ आखण्यावर जोर दिला आहे.

आपला संभाव्य प्रतिस्पर्धी उमेदवार आपल्यापेक्षा सरस ठरू नये, यासाठी प्रत्येकजण वेगवेगळी पद्धत वापरून आपणच कसे योग्य उमेदवार आहोत, हे मतदारांना पटवून देण्यात गुंतला आहे. मतदारांना आकर्षित करण्याच्या या प्रयत्नात अनेक भावी नगरसेवक आणि नगराध्यक्ष उमेदवारांना मोठी डोकेदुखी आणि शारीरिक दमछाक जाणवत आहे. निवडणुकीची तारीख लवकरात लवकर जाहीर होऊन निवडणूक प्रक्रिया पार पडावी, अशी चर्चा देखील आता अनेक इच्छुकांच्या गटांमध्ये दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, जोपर्यंत मतदान होत नाही, तोपर्यंत ‘मतदार राजा’ला खुश ठेवण्याकरिता इच्छुक उमेदवारांना “डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर” या म्हणीप्रमाणे संयम आणि गोडवा ठेवून वागावे लागणार आहे. दिवाळीच्या निमित्ताने मतदारांच्या दारात पोहोचण्याची संधी साधणाऱ्या या इच्छुकांना प्रत्यक्ष निवडणुकीत मतदारांचा प्रतिसाद कसा मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एकंदरीत, राहाता नगरपरिषदेच्या निवडणुकीची पूर्वतयारी दिवाळीच्या फराळ आणि शुभेच्छांच्या माध्यमातून सध्या शिगेला पोहोचली आहे.

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: विमान अपघाता होण्याआधी अजित पवारांचं कोणाशी झालं संभाषण? समोर...

0
मुंबई | Mumbaiमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले. अजित पवार हे कार्यकर्त्यांशी नाळ जोडलेले नेते...