राहता । प्रतिनिधी
राहाता नगरपरिषद निवडणुकीत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या पॅनलने नगराध्यक्ष पदासह 20 जागांवर विजय प्राप्त करून प्रतिस्पर्धी लोकक्रांती सेना पॅनलचा धुव्वा उडविला आहे. नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीचे डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी 9 हजार 451 मते मिळवून प्रतिस्पर्धी उमेदवार धनंजय गाडेकर यांचा 4 हजार 519 इतक्या मतांनी पराभव केला तर नगरसेवक पदाच्या 20 जागांपैकी 19 जागेंवर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे तर विरोधी लोकक्रांती पॅनलचे प्रभाग क्र. 9 मधील शशिकांत लोळगे हे एकमेव उमेदवार नगरसेवक पदी विजयी झाले आहेत.
राहाता नगर परिषदेच्या नगराध्यक्षपद व 20 नगरसेवक पदांसाठींची सार्वत्रिक निवडणूक 2 डिसेंबर रोजी संपन्न झाली होती. निवडणुकीची मतमोजणी रविवार 21 डिसेंबर रोजी राहाता नगरपालिकेच्या हॉलमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा राशिनकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल मोरे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्यासह उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सकाळी दहा वाजेनंतर मतमोजणी सुरू झाली. नगरसेवक पदासाठी मतमोजणीच्या दोन फेर्या संपन्न झाल्या. पहिल्या फेरीमध्ये निवडणुक निकालाचा कल उमेदवार व त्यांचे प्रतिनिधीं यांना जाणवत होता. अत्यंत चर्चेची झालेली ही निवडणूक नागरिक व परिसराचे दृष्टीने खूप लक्षवेधी होती.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी व मित्रपक्ष म्हणजेच महायुतीने पॅनल उभा केला होता. त्यांचे विरोधात शिवसेनेचे धनंजय गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली लोकक्रांती सेना अर्थात शहर विकास आघाडी या नावाने महायुतीचे विरोधकांनी पॅनल उभा केला होता. नगराध्यक्ष पदासाठी या दोन प्रमुख पॅनलचे उमेदवारांव्यतिरिक्त अपक्ष म्हणून भानुदास गाडेकर, बाळासाहेब गिधाड, अनिल पावटे, तुषार सदाफळ व रामनाथ सदाफळ हे पाच अपक्ष उमेदवार नगराध्यक्ष पदाचे निवडणूक रिंगणात होते. थेट जनतेतून नगराध्यक्ष पदाची निवड होती. नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे डॉ स्वाधीन गाडेकर विरुद्ध लोकक्रांती सेना अर्थात आघाडीचे धनंजय गाडेकर अशी प्रमुख लढत झाली या लढतीमध्ये डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी 9 हजार 451 मते घेत विजय मिळवून प्रतिस्पर्धी उमेदवार धनंजय गाडेकर यांचा 4 हजार 519 मतांनी पराभव केला. डॉ. स्वाधीन गाडेकर (9451 विजयी) तर धनंजय गाडेकर (4940 पराभूत), भानुदास गाडेकर (192), बाळासाहेब गिधाड (173), अनिल पावटे (50), तुषार सदाफळ (176), रामनाथ सदाफळ (106).
नगरसेवक पदांचे 20 जागांसाठी भारतीय जनता पार्टीने विरोधी पॅनलचा धुव्वा उडवत विरोधकांना प्रभाग क्रमांक नऊ मधील फक्त एका जागेवर खाते उघडण्याची संधी दिली. महायुतीचे 19 जागांवर नगरसेवक निवडून आले आहेत. विरोधी पॅनलचे शशिकांत लोळगे हे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये निवडून आल्याने विरोधकांना नगरपालिकेत आपले खाते उघडता आले. महायुतीला 21 विरुद्ध शून्यचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. निवडणूक निकालानंतर ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विजय उमेदवारांना शुभेच्छा देऊन मतदारांचे आभार मानले. तत्पूर्वी राहाता शहराचे ग्रामदैवत वीरभद्र महाराजांच्या चरणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व सर्व विजयी उमेदवार नतमस्तक झाले. तदनंतर ढोल ताशांच्या गजरात जेसीबीच्या साह्याने गुलालाची मुक्त उधळण करत फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये विजय उमेदवारांची मंत्री विखे पाटील यांच्या समवेत जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.
प्रभागनिहाय विजयी झालेले उमेदवार व प्रतिस्पर्धी
प्रभाग क्रमांक 1 अः पुजा गिधाड (1009 विजयी), आरती गिधाड यांना (432 ) मते मिळाली असून त्यांचा 577 मतांनी पराभव झाला आहे प्रभाग 1 ब प्रविण सदाफळ (1065 विजयी) झाले असून भास्कर सदाफळ 348 यांना मते मिळाली असून त्यांचा 717 मतांनी पराभव झाला आहे.
प्रभाग क्रमांक 2 अः रवीना माळी (905) विजयी झाले असून कविता पवार 497 यांना मते मिळाली आहेत त्यांचा 408 मतांनी पराभव झाला आह. 2 ब ः अरुण आग्रे (864) विजयी झाल्या असून रणजीत बोठे (400) मते पडली असून त्यांचा 464 मतांनी पराभव झाला.
प्रभाग क्रमांक 3 अः पुष्पा आरणे (1106) विजयी झाल्या असून जया आरणे यांना (473) मते मिळाली आहेत त्यांचा 630 मतांनी पराभव झाला आहे. 3 बः राहुल सदाफळ यांना (1146) विजयी मते मिळाली आहेत. दिलीप लांडगे यांना (442) मते पडले असून त्यांचा 704 मतांनी पराभव झाला आहे.
प्रभाग क्रमांक 4 अः अर्चना निकाळे (835 विजयी) मते मिळाली असून प्रतीक्षा निकाळे यांना (479) पडली. त्यांचा 356 मतांनी पराभव झाला. 4 बः विजय सदाफळ यांना (762 विजयी) मते मिळाली असून अनिल बोठे यांना (416) पडले आहेत. 346 मतांनी त्यांचा पराभव झाला आहे तर सागर कदम यांना 236 मते मिळाली.
प्रभाग क्रमांक 5 अः दशरथ तुपे यांना (633 विजयी) मते मिळाली. विजय मोगले यांना (260) पडली असून 373 मतांनी त्यांचा पराभव झाला आहे तर राजेंद्र पठारे यांना 241 मते मिळाली. 5 बः सविता सदाफळ (512) विजयी मते मिळाली असून मीनाक्षी माळवदे यांना (410) मते पडलेली आहेत त्यांचा 102 मतांनी पराभव झाला आहे.
प्रभाग क्रमांक 6 अः संदीप मुर्तडक (934 विजयी) मते मिळाली असून शाहरुख बागवान यांना (488) मते पडली आहेत. त्यांचा 446 मतांनी पराभव झाला. 6 बः मंगल सुरेश डांगे (841 विजयी) मते मिळाली असून सुनिता टाक यांना (411) मते पडली आहेत. त्यांचा 430 मतांनी पराभव झाला. गायकवाड सुवर्ण यांना 238 मते मिळाली.
प्रभाग क्रमांक 7 अ ः अंजली सदाफळ यांना (986 विजयी) मिळालेली असून मंगल सोमवंशी (452) यांना पडले आहेत त्यांचा 494 मतांनी पराभव झाला आहे. 7 ब ः शफिक शहा (501 विजयी) यांना मिळाली असून सलीम शहा यांना (अपक्ष 414) मते पडली आहेत. त्यांचा 87 मतांनी पराभव झाला. तर सागर लुटे यांना 310 व राजेंद्र अग्रवाल यांना 285 मते मिळाली.
प्रभाग क्रमांक 8 अ ः मयुर पाळंदे यांना (571 विजयी) मते मिळाली असून वसंत खरात (अपक्ष 390) मते पडले आहेत. त्यांचा 181 मतांनी पराभव झाला. अभिजीत काळे यांना 330 मते मिळाली. 8 ब ः अनिता शेळके यांना(686 विजयी) मते मिळाली असून नीलम सोळंकी यांना (379) मते पडली. त्यांचा 307 मतांनी पराभव झाला. उज्वला होले यांना 303 मते मिळाली आहे.
प्रभाग क्रमांक 9 अः शितल बनकर यांना (969 विजयी) मते मिळाली असून सुजाता राजगुरू यांना (365) पडले आहेत. त्यांचा 604 मतांनी पराभव झाला आहे. 9 ब लोळगे शशिकांत लोकक्रांती सेना यांना (690 विजयी) मते मिळाली आहेत तर उदय बोठे (भाजपा 653) पडली आहेत. त्यांचा 38 मतांनी पराभव झाला आहे.
प्रभाग क्रमांक 10 अः नीता गाडेकर यांना (1029 विजयी) मते मिळाली असून अर्चना बनकर यांना (609) मते पडली आहेत. त्यांचा 420 मतांनी पराभव झाला आहे. 10 ब ः नितीन गाडेकर यांना (1099 विजयी) मते मिळाली असून निवृत्ती गाडेकर यांना (535) पडली आहेत. त्यांचा 564 मतांनी पराभव झाला.
राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वावर व डॉ. सुजय विखे पाटील यांच्या व्हिजनवर विश्वास ठेवून मला नगराध्यक्षपदी विजयी केले तसेच माझ्या सर्व सहकार्यांना नगरसेवक पदाची संधी दिली त्याबद्दल सर्व नागरिकांचे व मतदार बंधू-भगिनींचे मी आभार मानतो. निवडणूक लोकशाही मार्गाने झाली सर्व विरोधकांनी खेळीमेळीच्या वातावरणात व खिलाडू वृत्तीने निवडणूक लढवली त्यांचे आभार मानतो यापुढे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खा. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली सर्व सहकारी नगरसेवकांचे मदतीने व नागरिकांच्या साथीने शहराचा विकास साधणार आहे.
– नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर
प्रभाग क्रमांक तीन मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राहुल मुकुंदराव सदाफळ यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा 704 मतांनी पराभव करून महायुतीच्या पॅनल मधील नगराध्यक्षसह नगरसेवक पदाच्या विजयी उमेदवारांमध्ये सर्वाधिक मताधिक्यांनी निवडून येण्याचा मान मिळवला आहे.





