Monday, July 27, 2026
Homeक्राईमCrime News : राहात्यात एकाच रात्री नवनाथ मंदिरासह 5 ठिकाणी चोर्‍या

Crime News : राहात्यात एकाच रात्री नवनाथ मंदिरासह 5 ठिकाणी चोर्‍या

चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद || श्वानपथक व ठसे तज्ज्ञांची घटनेच्या ठिकाणी भेट

राहाता |वार्ताहर|Rahata

येथील नवनाथ मंदिरात सोमवारी मध्यरात्री एका अज्ञात चोरट्याने मुख्य प्रवेशद्वाराच्या दरवाजाचे कुलूप तोडून दानपेटी फोडण्याचा अर्धा तास प्रयत्न करूनही यश न आल्याने चोरट्याने परिसरातील विक्रांत शिंदे यांच्या ग्राहक सेवा केंद्राचे कुलूप तोडून 45 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. तसेच संदीप गाडेकर व सोमनाथ गाडेकर यांच्या किराणा दुकानाचे देखील कुलूप तोडून साहित्याची चोरी केली. त्याने माणिक धनवटे यांच्या ऑफिसचे शटर तोडण्याचा प्रयत्न केला. एकाच रात्री या चोरट्याने अनेक ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्याने चोरी केल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये दिसून आला असून श्वानपथक तसेच ठसे तज्ज्ञांनी घटनेच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

- Advertisement -

वीरभद्र देवस्थानच्या अधिपत्याखाली असलेल्या नवनाथ मंदिरात सोमवारी रात्री सव्वादोन वाजता एका अज्ञात चोरट्याने मंदिराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आतील गाभार्‍यात प्रवेश केला. लोखंडी टामीने दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. जवळपास अर्धा तास या चोरट्याने दानपेटी तोडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य वापरले, परंतु दानपेटी न फुटल्याने मंदिरातील विविध ठिकाणचे पाच दरवाजाचे कुलूप तोडून मंदिरातील देवांसाठी वापरण्यात आलेल्या पूजेचे साहित्य ठेवणार्‍या खोलीत सामान अस्तव्यवस्थ केले.

अर्धा तास हा चोरटा मंदिरात असल्याचा सीसीटीव्ही कॅमेरात दिसून आला. यानंतर विक्रांत शिंदे यांच्या ग्राहक सेवा केंद्राचे शटर तोडून ड्रॉवरमध्ये असलेले 45 हजार रुपये रोख रक्कम चोरी केली, तसेच संदीप गाडेकर व सोमनाथ गाडेकर यांच्या किराणा दुकानाचे कुलूप तोडून साहित्याची चोरी केली. माणिक धनवटे यांच्या ऑफिसचे शटर तोडण्याचा प्रयत्न केला. या परिसरात राहणारे दिलीप मैत्री यांच्या घरासमोर वाळवणीसाठी ठेवलेले बेडशीट चोरी करून या चोरट्याने तोंड झाकण्यासाठी वापरले. एकाच रात्री या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी चोरी झाल्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंगळवारी पहाटे देवस्थानचे पुजारी लहू गाडेकर हे नेहमीप्रमाणे मंदिराची साफसफाई व देवतांची पूजा करण्यासाठी आले असता त्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी तात्काळ भेट देऊन मंदिराची पाहणी केली. तसेच श्वान पथकाने व ठसे तज्ज्ञांनी पाहणी केली. यापूर्वी देखील देवस्थानच्या विविध मंदिरात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. वीरभद्र मंदिरात देखील चोरट्यांनी चांदीच्या पादुका व चांदीच्या वस्तूंची चोरी केली होती; परंतु गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तात्काळ या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन 24 तासांच्या आत चोरट्यांना जेरबंद केले होते. अशाच प्रकारे नवनाथ मंदिरात चोरी करणार्‍या त्या चोरट्याचा पोलिसांनी शोध घेवून जेरबंद करावे, अशी मागणी केली जात आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : निळवंडेतूनही विसर्ग वाढविला; लाभक्षेत्रात समाधान

0
अकोले | Akole उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टीने भंडारदरा खालोखाल महत्वपूर्ण असणारे निळवंडे धरणही शुक्रवारी भरले. पाण्याची आवक वाढतच असल्याने अखेर निळवंडे धरणातील पाणीसाठा नियंत्रणासाठी काल...