नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिका आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे इराणवर जोरदार हवाई हल्ला केला. या हल्ल्यामध्ये इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. याचा बदला म्हणून इराणनेही अमेरिका आणि इस्रायलचे तळ तसेच दूतावास असलेल्या शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. सलग चौथ्या दिवशीही हे महायुद्ध सुरु असून जगातील अनेक देश या युद्धात उतरल्याचे समोर आले आहे. अशामध्ये भारताने मात्र आपली भूमिका जाहीर केलेली नसून दोन्ही देशांना शांततेच आवाहन केले होते. यावरून आता लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत सरकारवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधीनी काय पोस्ट केली आहे?
राहुल गांधी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणतात की, अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील शत्रूत्वाची भावना वाढत चालली असून, यामुळे सदर संवेदनशील प्रदेश व्यापक संघर्षाकडे ढकलला जात आहे. जवळजवळ एक कोटी भारतीयांसह कोट्यवधी लोक अनिश्चिततेचा सामना करत आहेत. इराणवरील एकतर्फी हल्ले तसेच इराणने मध्य पूर्वेतील इतर देशांवर केलेल्या हल्ल्यांचा निषेध केला पाहिजे. हिंसाचार हिंसाचाराला जन्म देतो, संवाद आणि संयम हा शांततेचा एकमेव मार्ग आहे,” असे ते म्हणाले. “भारत सरकारने इराण युद्ध आणि अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येबाबत आपली नैतिक भूमिका स्पष्ट करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मौन जगभरात भारताची विश्वासार्हता कमी करत आहे.” असे म्हणत हल्लाबोल केला.
अमेरिका इस्रायलसोबत संघर्ष सुरु असतानाच इराणवर नवं संकट; भूकंपाने हादरलं शहर
भारताने नैतिकदृष्ट्या स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे
“भारताने नैतिकदृष्ट्या स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. आंतरराष्ट्रीय कायदा आणि मानवी जीवनाच्या रक्षणासाठी स्पष्टपणे बोलण्याचे धाडस आपण केले पाहिजे. आपले परराष्ट्र धोरण सार्वभौमत्व आणि वादांच्या शांततापूर्ण निराकरणावर आधारित आहे आणि ते सातत्यपूर्ण राहिले पाहिजे. पंतप्रधान मोदींनी बोलले पाहिजे. जागतिक व्यवस्थेची व्याख्या करण्यासाठी ते राष्ट्रप्रमुखाच्या हत्येचे समर्थन करतात का?” असा सवाल खासदार राहुल गांधी यांनी यावेळी विचारला. तत्पूर्वी, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनीही इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येबद्दल मोदी सरकारच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.





