बिहार | Bihar
लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी सध्या बिहारच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी बाईक रॅलीत भाग घेतला होता. यावेळी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक झाल्याचे पहायला मिळाले. पूर्णिया येथे बाईक रॅली दरम्यान एक तरुण रॅलीत घुसला आणि त्याने राहुल गांधींना किस केले. त्यानंतर राहुल गांधींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने तातडीने त्या तरुणाला बाजूला केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी बिहारमध्ये मतदार हक्क यात्रेद्वारे राज्याचा दौरा करत आहेत. त्यांच्यासोबत इंडिया आघाडीच्या नेत्यांसह राजदचे तेजस्वी यादव देखील उपस्थित आहेत. आज, २४ ऑगस्ट रोजी राहुल गांधी बाईकवरुन अररियाच्या दिशेने निघाले असता, एक तरुण सुरक्षा घेरा तोडून राहुल गांधींच्या जवळ पोहोचला आणि त्यांना मिठी मारुन किस घेतला. यादरम्यान, सुरक्षा कर्मचाऱ्याने त्या तरुणाला बाजूला खेचून चापट मारुन पळवून लावले.
मतदार हक्क यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहे. ‘कोट्यवधी बिहारी लोकांच्या मतचोरी झाल्याचा आमच्या आरोपावर विश्वास आहे. त्यामुळेच आमच्या यात्रेला मोठा पाठिंबा मिळत आहे. योग्य मतदार यादी देण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे, मात्र महाराष्ट्र, हरियाणा आणि कर्नाटकमध्ये त्यांनी हे काम केले नाही. निवडणूक आयोगाने आपला दृष्टिकोन बदलावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, आता आम्ही बिहारमध्ये मत चोरी होऊ देणार नाही.’
राहुल गाांधींची यात्रा रविवारी अररियाला पोहोचली. येथून राहुल गांधी संध्याकाळी दिल्लीला रवाना होतील. मंगळवारी प्रियंका गांधी वाड्रा या यात्रेत सामील होणार आहेत. राहुल गांधींच्या या यात्रेचा आज आठवा दिवस आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




