नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकेने H-1B व्हिसावर 1 लाख डॉलर (सुमारे 90 लाख रुपये) एवढे शुल्क लावले आहे. या निर्णयाचा फटका अमेरिकेतील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय नागरिकांना बसणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांनी मोदींना ‘कमकुवत पंतप्रधान’ म्हणून संबोधले आहे.
राहुल गांधी यांनी २०१७ मधील आपली एका एक्स पोस्ट शेअर करत पंतप्रधानांवर निशाणा साधला. त्या पोस्टमध्येही त्यांनी पंतप्रधान मोदी कमकुवत असल्याचा आरोप केला होता. यावेळीही, “मी पुन्हा सांगतो की, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान आहेत,” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान भारतीयांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यात अपयशी ठरल्याच्या मुद्द्यावरून ही टीका करण्यात आली आहे.
तसेच त्यांनी आता एक नवीन पोस्ट केली आहे, ज्यामध्ये अमेरिकेने एच-१बी बाबत घेतलेल्या निर्णयासंबंधीत लेखाचा स्किनशॉट्स शेअर करत त्यांनी , “मी पुन्हा सांगतो, भारताला कमकुवत पंतप्रधान लाभले आहेत,” असे म्हटले आहे.
अमेरिकेने एच-१बी व्हिसाच्या फीमध्ये प्रचंड वाढ केली आहे, ज्यामुळे परदेशी नागरिकांना नोकरीवर घेणाऱ्या संस्थांना प्रत्येक अर्जासाठी १०००,००० डॉलर देणे अनिवार्य झाले आहे. याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम हा अमेरिकेत आयटीमध्ये काम करणाऱ्या भारतीय नागरिकांवर होणार आहे.
अखिलेश यादवांचीही टीका
समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनीही याच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, “अमेरिका पहिल्यांदाच भारताशी असे वागत आहे असे नाही. आपले परराष्ट्र धोरणं कमकुवत आहे. यापुढे इतर देशांनीही असे केले, तर आपली काय तयारी आहे? आपला देश आर्थिकदृष्ट्या जेवढा बळकट असायला हवा, तेवढा दिसत नाही. इतर देशांवरील आपले अवलंबित्व वाढत चालले आहे. खते आणि इतर गोष्टींसाठीही आपण इतर देशांवरच अवलंबून आहोत. ज्या देशाशी आपला सीमावाद आहे, त्यांच्याशी आपण व्यापार वाढवत आहोत.”
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




