दिल्ली l Delhi
कृषि विधेयकांवरून रविवारी राज्यसभेत विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला होता. या गोंधळावर सभापती व्यंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त करत या घटनेची निंदा केली आहे. उपसभापती हरिवंश यांच्यासमोर गैरवर्तन केल्याबद्दल सभापती व्यंकय्या नायडू यांनी आठ खासदारांना एका आठवड्यासाठी सदनाच्या कामकाजातून निलंबित केले आहे. या निलंबावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी ट्वीट करत मोदी सरकारवर निशाना साधला आहे.
राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हंटले आहे, “लोकशाही देशाला गप्प बसवणं सुरूच आहे. सुरूवातीला आवाज दाबला गेला. त्यानंतर खासदारांना निलंबित करण्यात आलं आणि शेतकऱ्यांसाठी आणलेल्या काळ्या कायद्याकडे डोळेझाक करण्यात आली. या सर्वज्ञानी सरकारच्या अहंकाराने संपूर्ण देशाला आर्थिक संकटात ढकललं आहे,”
निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांचाही समावेश आहे. याशिवाय राजू सातव, के के रागेश, रिपून बोरा, डोला सेन, सय्यद नझीर हुसैन आणि एलामारन करिम यांचाही निलंबित खासदारांमध्ये समावेशी आहे. राज्यसभेत कृषि विधेयकांवर चर्चा आणि मतदान सुरू असताना विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. विधेयकं संमत करून घेण्यासाठी उपसभापतींनी राज्यसभेचं कामकाजाची वेळ वाढवली. यावर, उपसभापतींच्या निर्णयावर खासदारांनी जोरदार आक्षेप घेत सभागृहात तोडफोडही केली. खासदारांनी सभागृहातच नियम पुस्तिका फाडली तसेच माईकही तोडण्यात आला. ‘विधेयकांवर चर्चा सरकारला नकोय. त्यांना केवळ लवकरात लवकर ही विधेयकं मंजूर करायची आहेत. ही विधेयकं आणण्यापूर्वी विरोधकांशी संवाद साधणं गरजेचं होतं. करोनाच्या नावावर अध्यादेश काढले गेले. सरकारनं भारतीय मजूर संघालाही विश्वासात घेतलेलं नाही’ असा आरोप विरोधी खासदारांकडून करण्यात आला.