मुंबई | Mumbai
काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज (गुरुवार) दिल्लीतील इंदिरा भवन येथे पत्रकार परिषद घेत मत चोरीवरून (Vote Chori) पुन्हा एकदा भाजपवर गंभीर आरोप केले. तसेच पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक मतदारसंघांचे उदाहरण देत मते वाढविण्यात आल्याचा आरोपही केला.
यावेळी राहुल गांधींनी मत चोरीसाठी मोठ्या सॉफ्टवेअरचा वापर केला गेल्याचे म्हणत कॉल सेंटरमधून ही प्रक्रिया राबवण्यात आल्याचा गंभीर आरोप केला. तसेच महाराष्ट्रातील राजुरा विधानसभा मतदारसंघात (Rajura Assembly Constituency) हजारो मतदारांची नावे वगळून ६ हजार ८५० नवीन नावे जोडण्यात आली, असे म्हटले. त्यामुळे या मतदारसंघाची नेमकी काय परिस्थिती आहे आणि मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत कोण विजयी झाले होते हे जाणून घेणार आहोत.
२०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur District) राजुरा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या देवराव भोंगले यांनी काँग्रेसच्या (Congress) सुभाष धोटे यांचा पराभव करत बाजी मारली. भोंगळे यांना ७२ हजार ८८२ तर धोटे यांना ६९ हजार ८२८ मते मिळाली होती. यात भोंगळे यांनी धोटे यांचा ३ हजार ०५४ मतांनी पराभव केला. त्यानंतर आज राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेत याच राजुरा मतदारसंघाचा उल्लेख करत ६ हजार ८५० नावे जोडण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी याच राजुरा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुभाष धोटे यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले होते की, “राजुरा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीपूर्वी बोगस मतदार नोंदणी झाल्याची तक्रार जिल्हाधिकारी आणि एसडीएम यांच्याकडे केली होती. माझ्या तक्रारीनुसार त्यांनी ६ हजार ८५३ मते कमी देखील केली. त्यानंतर देखील दहा-बारा हजार मते अशी होती. परंतु, निवडणुकीच्या घाईगर्दीत त्याकडे लक्ष गेले नाही. मात्र राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपानंतर आम्ही सतर्क झालो आणि आम्ही देखील गावागावात अशी चौकशी केली, तेव्हा आम्हाला गडचांदूर आणि राजुरामध्ये जास्तीचे मतदार आढळले. त्याची आम्ही चौकशी करत आहोत. मात्र, ६ हजार ८५३ जी नावे बोगस आढळली, ती ज्यांनी एनरोल (enroll) केली त्यांच्यावर निवडणूक आयोगाने अजूनही कुठलीही कारवाई केलेली नाही. आम्ही निवडणूक आयोगासोबत वारंवार पत्रव्यवहार करत आहोत, मात्र याबाबत त्यांचा काहीही खुलासा आलेला नाही, असे त्यांनी म्हटले होते.
राजुरा मतदारसंघातील लोकसंख्या आणि मतदान केंद्रे
राजुरा मतदारसंघात एकूण ३,१५,०७३ नोंदणीकृत मतदार आहेत, ज्यात १,५९,८२१ पुरुष आणि १,५५,२५२ महिला मतदारांचा समावेश आहे. तर मतदारसंघात एकूण ३४४ मतदान केंद्रे होती.




