नवी दिल्ली | New Delhi
29 जुलै रोजी पेपर लीक विरोधी विधेयकावरील चर्चेदरम्यान केलेल्या वक्तव्याप्रकरणी लोकसभा सचिवालयाने (Lok Sabha Secretariat) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी भाजपचे खासदार अनुराग ठाकूर आणि संजय जयस्वाल यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. त्यांना 28 ऑगस्टपर्यंत आपले उत्तर सादर करण्यास सांगितले आहे.
पेपर लीक विरोधी विधेयकावरील चर्चेदरम्यान अमित शाह (Amit Shah) यांच्या विरोधात वक्तव्य केल्याबद्दल लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. 29 जुलै रोजी विधेयकावरील चर्चेदरम्यान राहुल यांनी ‘इडियट’ आणि ‘अंधभक्त’ यांसारखे शब्द वापरले होते. तथापि, अध्यक्ष ओम बिरला यांनी हे शब्द सभागृहाच्या कामकाजातून वगळले.
लोकसभेतील भाजपचे मुख्य प्रतोद, संजय जयस्वाल (BJP Chief Whip Sanjay Jaiswal) यांनी एक्सवर एक पत्र शेअर केले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अमित शाह यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांसंदर्भात त्यांनी विशेषाधिकार भंगाची नोटीस दाखल केली आहे. या वक्तव्यांमुळे खासदार म्हणून अमित शाह यांच्या प्रतिष्ठेला आणि संसदेच्या शिष्टाचाराला धक्का पोहोचला. जयस्वाल यांनी 29 जुलै रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला (Lok Sabha Speaker Om Birla) यांना पत्र लिहून नियमांनुसार राहुल गांधी यांच्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी केली होती.
दरम्यान, अनुराग ठाकूर (BJP MP Anurag Thakur) यांनी 30 जुलै रोजी राहुल गांधी यांच्या विरोधात विशेषाधिकारभंगाची नोटीस दाखल केली. या तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विधेयकावरील लोकसभेतील चर्चेदरम्यान असंसदीय आणि अपमानास्पद भाषा वापरली. त्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोपही केले, परंतु सभागृहाच्या नियम 353 नुसार त्यांना पुरेशी पूर्वसूचना देण्यात आली नाही.




