अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राहुरीतील डॉ. बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आता चौथ्यांदा निविदा प्रसिद्ध करणार आहे. तीन वेळा प्रसिद्ध केलेल्या निविदांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने फेरनिविदा काढली जाणार आहे. मात्र, आता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने इतर साखर कारखाने चालवण्यास देताना लागू केलेल्या अटी व नियमांचा अभ्यास करून जिल्हा बँक करार करणार आहे. त्यामुळे अटी व नियम शिथिल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी यासंदर्भातील माहिती दिली. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, ज्येष्ठ संचालक सीताराम गायकर, अण्णासाहेब म्हस्के, अरुण तनपुरे, अंबादास पिसाळ, गणपतराव सांगळे, करण ससाणे, अमोल राळेभात, गितांजली शेळके, अनुराधा नागवडे व कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे आदी उपस्थित होते. याबाबतचा निर्णय गुरुवारी झालेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हा बँकेने तनपुरे कारखान्याला वित्त पुरवठा केला आहे. परंतु कारखाना डबघाईस येऊन बंद पडल्याने त्यावरील व्याजासहित कर्जभार 134 कोटींवर जाऊन पोहोचला आहे.
या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी जिल्हा बँकेने कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यात देण्याचा निर्णय घेतला. मात्र, तीनवेळा निविदा प्रसिद्ध होऊनही त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. आता गुरूवारी झालेल्या जिल्हा बँक संचालक मंडळाच्या बैठकीत बँकेच्या अधिकार्यांनी राज्य शीखर बँकेने इतर कारखाने चालवण्यास देताना ज्या पद्धतीचे करार केले आहेत, त्याचा अभ्यास करून नियमावली तयार करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यानंतर चौथ्यांदा निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे.
कारखान्याची निवडणूक घेऊन नवीन संचालक मंडळाला भाडेतत्त्वावर कारखाना चालवण्यास द्यावा, अशी मागणी पुढे येत आहे. यासंदर्भात बोलताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष कर्डिले यांनी सांगितले की, हा प्रयोग यापूर्वी एकदा करण्यात आलेला आहे. तो यशस्वी झाला नाही. विखे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाला भाडेतत्त्वावर कारखाना देण्यात आला. मात्र कर्जाची परतफेड झाली नाही. कारखाना कोणाच्याही ताब्यात गेला तरी बँकेचे कर्ज परतफेड केले जाईल, याची शाश्वती वाटत नाही.
बँकेची वसुली 52 टक्के
जिल्हा बँकेच्या काल झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत जिल्ह्यातील पावसाच्या स्थिती सोबत यापूर्वी राज्य सरकारने दिलेल्या सवलत योजनेनुसार बँकेची 52 टक्के वसुली झाली असल्याची माहिती देण्यात आली. तनपुरे कारखान्यांसह अन्य विषयांवर यावेळी बैठकीत चर्चा करण्यात आली.
बंद कारखान्यात चोर्या वाढल्या
तनपुरे कारखान्याकडे जिल्हा बँकेचे 134 कोटी रुपये थकीत असले तरी हा बंद कारखाना सांभाळणे बँकेसाठी जिकीरीचे झाले आहे. गेल्या दोन वर्षांत सुरक्षा व्यवस्था व इतर कारणासाठी बँकेला सुमारे 2 कोटी रुपये खर्च आलेला आहे. याशिवाय कारखाना बंद असल्याने तेथे चोर्याही वाढल्या आहेत. त्यामुळे नुकसानही होत आहे. जिल्हा बँकेने राहुरी पोलिसांकडे तक्रार अर्ज देऊन कारखाना परिसरात गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.
कामगारांची देणी देण्यासाठी तरतूद करणार
यापूर्वी तीनवेळा निविदा प्रसिद्ध होऊनही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आता चौथ्यांदा निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे आता एका संस्थेकडून जरी प्रतिसाद मिळाला तरी जिल्हा बँकेला करार करताना कायदेशीर अडचण राहणार नाही, असा सल्ला वकिलांनी दिल्याचे बँक अध्यक्ष कर्डिले यांनी सांगितले. करार करताना कारखाना कामगारांची देणी देण्यासाठी नियमावली तयार करण्याच्या प्रयत्नात असल्याचेही त्यांनी सांगितले.