राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील म्हैसगाव – ताहाराबाद रस्त्यावरील दुकानात मुरूमाचा डंपर शिरला. यात एक पाच वर्षीय बालक गंभीर जखमी झाला. ही घटना काल शनिवारी दुपारीच्या सुमारास घडली. म्हैसगावहुन राहुरीच्या दिशेने मुरुमाने भरलेल्या भरघाव डंपर (क्र. एमएच-38 एक्स 1150) च्या चालकाचा ताबा सुटल्याने डंपर म्हैसगाव – ताहाराबाद रस्त्यावर असलेल्या मच्छिंद्र पारधे यांच्या दुकानात शिरला. या घटनेत एक पाच वर्षीय अल्पवयीन चिमुरडा गंभीर जखमी झाला. त्याला राहुरी येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले असल्याचे समजते.
घटनेनंतर डंपर चालक घटनास्थळावरून पसार झाला असून डंपर चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचेही स्थानिकांकडून बोलले जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मच्छिंद्र पारधे यांच्या दुकानाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.




