अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राहुरी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) (LCB) पथकाने मोठी कारवाई करत कर चुकवून 13 ट्रक (Truck) मधून आणलेली 6 कोटी 17 लाख 85 हजार रूपये किमतीची 2 लाख 5 हजार 950 किलो सुपारी (Betel Nut), 15 लाख 60 हजार रूपये किमतीची 7 हजार 800 किलो तंबाखु (Tobacco) असा तब्बल 8 कोटी 43 लाख 45 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) केला आहे.
गुजरात (Gujarat) राज्यात गुटखा बनविण्यासाठी कर्नाटक (Karnataka) येथून अवैध रित्या आणण्यात आलेला हा माल बनावट बिलांवरून वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, यासंदर्भात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून वस्तु आणि कर सेवा विभाग, अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती देण्यात आली असून त्यांच्यासह पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (SP Somnath Gharge) यांनी दिली. अधीक्षक घार्गे यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई बुधवारी (27 ऑगस्ट) रात्री केली.
अधीक्षक घार्गे यांनी सांगितले, बुधवारी राहुरी तालुक्यातील चिंचोली शिवार, हॉटेल महालक्ष्मी, चौधरी पॅलेस परिसरात माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला. तेथे आलेले 13 ट्रक तपासण्यात आले असता, ट्रक चालकांकडे वाहतूक परवाना किंवा ई-वे बिल आढळून आले नाही. त्यांच्या ताब्यातील बिले ही संगणीकृत नसून हस्तलिखित व बनावट असल्याचे निदर्शनास आले. बिलांमध्ये माल दिल्लीला पोचविण्याचे नमूद केले होते. कारवाईत एकूण 13 ट्रक आढळून आले. यापैकी 10 ट्रक चालकांना ताब्यात घेण्यात आले व नंतर नोटीस देऊन सोडून देण्यात आले. उर्वरित 3 ट्रक चालक पसार झाले आहेत. ताब्यात घेतलेल्या वाहनांमध्ये सडलेली लाल सुपारी व तंबाखू आढळली. चौकशीत चालकांनी हा माल कर्नाटक येथील मोहंमद अक्रम यांचा असल्याचे सांगितले.
सदर सुपारी व तंबाखू गुजरातमध्ये गुटखा बनविण्यासाठी नेत असल्याचे त्यांनी कबूल केले. पोलिसांनी 6 कोटी 17 लाख 85 हजार रूपये किमंतीची 2 लाख 5 हजार 950 किलो सुपारी, 15 लाख 60 हजार रूपये किमतीची 7 हजार 800 किलो तंबाखु व 2 कोटी 10 लाखाच्याा 13 ट्रक असा तब्बल 8 कोटी 43 लाख 45 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याचे अधीक्षक घार्गे यांनी सांगितले. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे, गणेश लबडे, राहुल व्दारके, लक्ष्मण खोकले, भिमराज खर्से, रिचर्ड गायकवाड, राहुल डोके, सतिष भवर, सुनिल मालणकर, महादेव भांड, उमाकांत गावडे यांच्या पथकाने केली.
बनावट बिले उघड
ट्रक चालकांकडे वाहतूक परवाना किंवा ई-वे बिल आढळून आले नाही. त्यांच्या ताब्यातील बिले ही संगणीकृत नसून हस्तलिखित व बनावट असल्याचे निदर्शनास आले. जप्त केलेल्या मालाबाबत व करचुकवेगिरी प्रकरणी राज्य कर सह आयुक्त, वस्तु व कर सेवा विभाग, अहिल्यानगर तसेच अन्न व औषध प्रशासन विभाग, अहिल्यानगर यांना पत्रव्यवहार करण्यात आला असून पुढील कारवाई त्यांचेमार्फत सुरू आहे. पोलिसही आपल्या पातळीवर चौकशी करत आहे. चौकशीअंती पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे अधीक्षक घार्गे यांनी सांगितले.




