राहुरी (प्रतिनिधी)
राहुरी तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला नाशिक-सुरत रोडलगत परिसरातील जंगलात डांबून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार राहुरी पोलिसांनी उघडकीस आणला. आरोपीच्या तावडीतून मुलीची सुटका करून तिला सुरक्षितरित्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मुख्य आरोपीसह त्याला मदत करणारे आणखी दोन आरोपी अशा एकूण तिघांना अटक करण्यात आली आहे.
दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास सदर मुलगी कॉलेजला जाते असे सांगून घरातून निघाली; मात्र परत न आल्याने पालकांनी राहूरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली राहूरी पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली. गोपनीय बातमीदारांची मदत, तांत्रिक विश्लेषण व सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या आधारे १८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री नाशिक जिल्ह्यातील रामशेज किल्ल्यानजीक जंगलात आरोपीच्या ताब्यातून मुलीची सुटका करण्यात आली.
पीडितेच्या जबाबानुसार, कॉलेजला जात असताना आरोपीने तिचे अपहरण करून तिला नाशिक जिल्ह्यातील जंगल परिसरात नेले व पाच दिवस डांबून ठेवत अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार प्रकरणात पोस्को व लैंगिक अत्याचारासंदर्भातील कलमे वाढवून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोसई गणेश वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल इफ्तेखार सय्यद, चांद पठाण, प्रमोद ढाकणे, सतीश कुराडे, नदीम शेख यांनी कारवाई केली. तपासात पोसई राजू जाधव, पोहेका राहुल यादव, पोहेकॉ सुरज गायकवाड, पोहेकॉ विकास साळवे, गणेश लिपने, सचिन ताजने, म.पो.हे.कॉ. कोहकडे, मपोको वंदना पवार यांनी सहाय्य केले. सदर गुन्ह्याचा तपास पोसई गणेश वाघमारे व रायटर पोलीस कॉन्स्टेबल इफ्तेखार सय्यद करीत आहेत.





